पुणे - थंडीचा कडाका ओसरला असून, आता राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. पुणे आणि परिसरात बुधवारी (ता.13) आणि गुरुवारी (ता.14) आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण-गोवा या भागांत बऱ्याच ठिकाणी किमान तापमान तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढल्याचे दिसून आले. विदर्भात शुक्रवारी (ता. 15) तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुक्काम ठोकून असलेल्या कडाक्याच्या थंडीचा प्रभाव ओसरत आहे. थंडीनंतर वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यात पावसाला अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. तर, मराठवाड्यातही किमान तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने नोंदविले आहे.
|