तीन दिवसांत थंडीची चाहूल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

तिन्ही ऋतूंचा अनुभव
पुणेकरांनी या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिन्ही ऋतूंचा अनुभव घेतला आहे. पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा चटका, तर सायंकाळी मुसळधार पाऊस, असे दृश्‍य शहरात अनेकदा होते. मात्र आता परतीच्या पावसाचे चक्र संपले असून पुढील आठवड्यापासून हिवाळ्याचे आगमन होणार आहे.

पुणे - पाऊस यंदा सगळेच सण साजरे करतोय की काय, अशी शंका पुणेकरांना होती; मात्र वेधशाळेने ती आता दूर केली आहे. येत्या तीन दिवसांत पुणेकरांना थंडीची चाहूल लागणार आहे. एकीकडे परतीच्या पावसाने नागरिकांचे हाल केले होते; पण आता येत्या १० नोव्हेंबरपासून पुण्याचे तापमान कमी होण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच, आता पावसाचा जोर कमी झाल्याचेही वेधशाळेने म्हटले आहे. 

वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार ऑक्‍टोबर, नोव्हेंबर हे महिने परतीच्या मॉन्सूनचे महिने म्हणून ओळखले जातात. या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये पुण्यात सर्वाधिक पाऊस पडला होता, तर नोव्हेंबरच्या सुरवातीलादेखील पाऊस होता. 
दरवर्षी साधारणपणे नोव्हेंबरच्या मध्यापासून हिवाळ्याची सुरुवात होते; परंतु अरबी समुद्रातील चक्रीवादळांमुळे परतीच्या पावसाचा कालावधीदेखील वाढला होता. चक्रीवादळाचा प्रभाव संपत असताना, येत्या काही दिवसांमध्ये वातावरणात थंडावा राहणार असल्याचे वेधशाळेतील वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्‍यपी यांनी सांगितले. शहरातील तापमान १८ ते १५ डिग्री सेल्सिअस असेल, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold start in three days