द्राक्षाचा गोडवा घटला

रवींद्र पाटे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

नारायणगाव - वाढलेल्या थंडीमुळे द्राक्ष मण्यात निर्यातीसाठी आवश्‍यक अपेक्षित साखर (वीस ब्रिक्‍स) तयार होण्यात नैसर्गिक अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे चीन देशात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पाच फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या स्प्रिंग फेस्टिव्हलसाठी तयार झालेली द्राक्ष निर्यात करण्यावर मर्यादा आल्या आहेत. यामुळे द्राक्ष उत्पादकांना या वर्षी मोठा आर्थिक फटका बसला आहे.

नारायणगाव - वाढलेल्या थंडीमुळे द्राक्ष मण्यात निर्यातीसाठी आवश्‍यक अपेक्षित साखर (वीस ब्रिक्‍स) तयार होण्यात नैसर्गिक अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे चीन देशात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पाच फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या स्प्रिंग फेस्टिव्हलसाठी तयार झालेली द्राक्ष निर्यात करण्यावर मर्यादा आल्या आहेत. यामुळे द्राक्ष उत्पादकांना या वर्षी मोठा आर्थिक फटका बसला आहे.

चीनमध्ये फेब्रुवारीत स्प्रिंग फेस्टिव्हल साजरा केला जातो. या फेस्टिव्हलसाठी पुणे, नाशिक भागांत उत्पादित होणाऱ्या जंबो द्राक्षाला प्रामुख्याने चीन देशातून गेल्या काही वर्षांपासून मागणी वाढली आहे. मात्र ही द्राक्षे वीस जानेवारीपूर्वी प्रीकुलिंग करून चीन बाजारपेठेत पोच होणे आवश्‍यक आहे. येडगाव (ता. जुन्नर) येथील कंपनीच्या मार्फत पुणे व नाशिक भागांतील जंबो द्राक्ष दरवर्षी वीस जानेवारीपूर्वी चीन फेस्टिव्हलसाठी निर्यात केली जातात.

यामुळे सप्टेंबर महिन्यात अगाऊ छाटणी केलेल्या व जानेवारी महिन्यात परिपक्व होणाऱ्या जंबो द्राक्षाला या कालावधीत वाढीव बाजारभावाचा फायदा होतो. या वर्षी डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका वाढला होता. पुणे व नाशिक भागांतील द्राक्ष पट्ट्यात रात्रीचे तापमान सहा अंश सेल्सिअस ते साडेसात अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले होते. वास्तविक द्राक्ष परिपक्व होण्याच्या अवस्थेत तापमान दहा अंश सेल्सिअस ते पंधरा अंश सेल्सिअसपर्यंत राहिल्यास द्राक्षाला आकर्षक काळा रंग येऊन द्राक्ष मण्यात अपेक्षित वीस ब्रिक्‍स साखर तयार होण्यास मदत होते. मात्र या वर्षी द्राक्ष परिपक्व होण्याच्या अवस्थेत डिसेंबर महिन्यात तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिले. यामुळे अगाऊ सप्टेंबर महिन्यात छाटणी झालेल्या बागेतील द्राक्ष जानेवारी महिन्यात परिपक्व झाली. मात्र थंडीमुळे निर्यातीसाठी अपेक्षित असलेली वीस ब्रिक्‍स साखर तयार झाली नसल्याचे प्रयोगशाळा तपासणीत अाढळून आले.
 

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी युरोप व एशियन देशात भारतीय द्राक्षाला वाढीव मागणी असल्याने द्राक्षाला वाढीव भाव मिळतो. मात्र या वर्षी थंडी वाढल्याने पांढऱ्या व काळ्या जातीच्या द्राक्षात अनुक्रमे आवश्‍यक असलेली अठरा ब्रिक्‍स व वीस ब्रिक्‍स साखर तयार झाली नाही. मण्यांच्या फुगवणीवर परिणाम झाला. यामुळे द्राक्ष परिपक्व होऊन देखील द्राक्ष निर्यातीवर मर्यादा आल्या. 
- बिजू जोसेफ, डीजे एक्‍स्पोर्ट

उत्पादकांना आर्थिक फटका 
वाढलेल्या थंडीचा फटका बसल्याने मण्यांमध्ये अपेक्षित साखर तयार झाली नाही. यामुळे काढणी कालावधी वाढला. केवळ साखर तयार न झाल्याने चीनमध्ये साजऱ्या होणाऱ्या स्प्रिंग फेस्टिव्हलसाठी द्राक्ष वीस जानेवारीपूर्वी पाठवता येणार नसल्याने वाढीव बाजारभावाचा मोठा आर्थिक फटका उत्पादकांना बसला आहे.

Web Title: cold temperature affected on grapes