थंडी दोन दिवसांमध्ये वाढणार  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

पावसाची शक्‍यता
पुणे - थंडीने कुडकुडलेल्या मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या तुरळक भागात येत्या रविवारपासून (ता. १०) पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने शुक्रवारी व्यक्त केली. गेल्या चार-पाच दिवसांपासून वाढलेला किमान तापमानाचा पारा आता पुन्हा सरासरीपेक्षा खाली घसरला आहे. राज्यात सर्वांत नीचांकी तापमान महाबळेश्‍वर येथे ९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

पुणे - पुण्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. शहरात शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत किमान तापमानाचा पारा १०.२ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला. पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमान अजूनही कमी होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून गार वारे वाहत आहेत. किमान तापमानाचा पारा तीन दिवसांपासून सातत्याने खाली घसरत आहे. गुरुवारी रात्रीपासून थंडीचा कडाका वाढला होता. किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा १.२ अंश सेल्सिअसने कमी होऊन १०.२ अंश सेल्सिअस नोंदला गेला. दिवसाही शहरात गार वारे वाहत होते. त्यामुळे कमाल तापमानही ४ अंश सेल्सिअसने कमी झाले. ते २७.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला. त्याच वेळी उत्तर भारतातून थंड वारे शहराच्या दिशेने वाहत असल्याने शहरात थंडी पडली आहे. पुढील दोन दिवस ही स्थिती राहणार असल्याने किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदले जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

शहरात पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा ८ ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्‍यता असल्याने थंडी या दोन दिवसांमध्ये कायम राहील. येत्या सोमवारनंतर (ता. ११) आकाश ढगाळ राहणार असल्याने किमान तापमानात पुन्हा वाढ सुरू होईल.

पावसाची शक्‍यता
पुणे - थंडीने कुडकुडलेल्या मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या तुरळक भागात येत्या रविवारपासून (ता. १०) पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने शुक्रवारी व्यक्त केली. गेल्या चार-पाच दिवसांपासून वाढलेला किमान तापमानाचा पारा आता पुन्हा सरासरीपेक्षा खाली घसरला आहे. राज्यात सर्वांत नीचांकी तापमान महाबळेश्‍वर येथे ९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

पश्‍चिमी चक्रावात आणि वाऱ्याच्या चक्रीय स्थितीच्या प्रभावामुळे उत्तर भारतात पाऊस आणि गारपीट सुरू आहे. त्याच वेळी ओडिशा, मध्य प्रदेश, तेलंगण, विदर्भाचा काही भागात थंडीची लाट निर्माण झाली आहे. हवामानात होत असलेल्या बदलाचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही होत आहे. त्यामुळे राज्यात किमान तापमान कमी-जास्त होत असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The cold wave will increase in two days