पुणे - बंगालच्या उपसागरात तयार होऊ घातलेल्या ‘मंदौस’ चक्रीवादळामुळे पुण्यात ढगाळ वातावरण तयार होत असून, शनिवार (ता. १०) नंतर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात थंडी गायब होत, किमान तापमानातील चढ उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.
बुधवारी पहाटे शहरात धुके पडले होते, तर दिवसभर आकाश अंशतः ढगाळ असल्याचे पाहायला मिळाले. शहरातील किमान सरासरी तापमानातही सामान्य तापमानापेक्षा दोन ते तीन अंशांनी जास्त होते. पुढील दोन दिवस सकाळी व संध्याकाळी धुके आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा वाढू लागला असून, राजस्थानातील चूरू येथे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्याप्रमाणे राज्यातही थंडी नाहीशी झाली आहे. दिवसा ढगाळ हवामानासह उकाडा चांगलाच वाढू लागला आहे. बुधवारी गडचिरोली येथे राज्यातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३५.५ अंश तापमान नोंदले गेले.
उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात ढगाळ वातावरण झाले आहे. उद्यापासून (ता. ९) कोकण, तर शनिवारपासून (ता. १०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तर रविवारपासून (ता. ११) विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मंदौस किनाऱ्याकडे -
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ही प्रणाली कारईकलपासून पूर्वेकडे ६९० किलोमीटर, तसेच चेन्नईपासून ७७० किलोमीटर आग्नेयेकडे होती. शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी या प्रणालीचे चक्रीवादळात रुपांतरण होऊन, गुरूवारी (ता. ८) सकाळपर्यंत ही वादळी प्रणाली उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला धडकणार आहे. पूर्व किनाऱ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.