Vidhan Sabha 2019 : मतदानाचा टक्‍का वाढणार; जिल्हाधिकाऱ्यांना विश्‍वास

evm.jpg
evm.jpg

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 21) मतदान होत असून, जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्‍केवारी निश्‍चितच वाढेल, असा विश्‍वास जिल्हा निवडणूक अधिकारी नवलकिशोर राम यांनी व्यक्‍त केला. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. 19) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत या वेळी उपस्थित होते. 

राम म्हणाले, "एकूण मतदान केंद्रांपैकी 283 केंद्रे तात्पुरत्या शेड्‌समध्ये आहेत. पावसामुळे त्याठिकाणी काही व्यत्यय येणार नसून, सर्व ईव्हीएम सुरक्षित राहतील. तसेच, 134 मतदान केंद्रे ही पहिल्या- दुसऱ्या मजल्यावर आहेत; परंतु त्याठिकाणी लिफ्टची सुविधा आहे. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प आणि तीन हजारांहून अधिक व्हीलचेअर देण्यात आल्या आहेत. सर्व मतदान केंद्रांवर मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसेच, कॉल सेंटरद्वारे दररोज सरासरी तीन हजार मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यात येत आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांची संख्या 70 हजार इतकी आहे. ते मतदानापासून वंचित राहणार नाहीत, याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणी जॅमर बसविण्याची काहींनी मागणी केली आहे. परंतु त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त, निवडणूक निरीक्षकांची देखरेख असणार आहे.'' 

सोशल मीडियावर लक्ष 
 उमेदवाराचे अधिकृत संकेतस्थळ, फेसबुक किंवा ट्‌विटर अकाउंटव्यतिरिक्‍त सोशल मीडियातील इतरांच्या अकाउंटवर नियंत्रण ठेवणे अशक्‍य आहे; परंतु सोशल मीडियावर प्रचार सुरू असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवारावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी राम यांनी स्पष्ट केले. 

विधानसभा निवडणूक 2019 (पुणे जिल्हा) 

मतदारसंघ 21 
एकूण मतदार : 77 लाख 29 हजार 217 
पुरुष मतदार : 40 लाख 42 हजार 89 
महिला मतदार : 36 लाख 86 हजार 885 
तृतीयपंथी मतदार : 243 


दिव्यांग मतदार : 67 हजार 279 
तरुण नवमतदार : 1 लाख 20 हजार 893 


मतदान केंद्रे : 7 हजार 915 
संवेदनशील मतदान केंद्रे : 251 
सखी मतदान केंद्रे : 23 


मतदानासाठी अडचण आल्यास संपर्क क्रमांक 
टोल फ्री क्रमांक 1950 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com