'वर्षभराचे पाणी नियोजन तूर्त नाही'

Naval-kishor-ram
Naval-kishor-ram

प्रश्‍न- पाणी वाटपाची महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर आली आहे. त्याबाबत आपली भूमिका काय असणार आहे? 
राम- चालू वर्षी भरपूर पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे ही काठोकाठ भरलेली आहेत. अगदी ऑक्‍टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत धरणे ही पूर्ण भरल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत यंदा पहिल्यांदाच पाहावयास मिळाले आहे. परिणामी, पुणे शहराला पिण्यासाठी आणि जिल्ह्यातील शेतीला सिंचनासाठी पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अडचण येणार नाही. त्यानुसार नियोजन केले जाईल. 

आपल्या अध्यक्षतेखालील नव्या कालवा सल्लागार समितीची रचना कशी असेल? यात लोकप्रतिनिधींचा समावेश असेल का? 
- या समितीच्या रचनेबाबत अद्याप सरकारकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यावर भाष्य करता येणार नाही. मात्र, समितीत लोकप्रतिनिधींचा समावेश नसेल, असा अंदाज आहे. 

नवनिर्वाचित आमदारांना अद्याप आमदारकीची शपथ देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे नवे लोकप्रतिनिधी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकतील का? 
- जिल्हा प्रशासन हे नागरिकांच्या सेवेसाठीच आहे. लोकप्रतिनिधी हे तांत्रिकदृष्ट्या या समितीचे सदस्य नसले तरी, लोकप्रतिनिधी या नात्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकतात. अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेऊ शकतात आणि कामेही करू शकतात. कारण, ते जनतेतून निवडून आलेले आहेत. त्यांना निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. केवळ शपथविधी न होणे, ही तांत्रिक बाब आहे. जिल्हा प्रशासन हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न ऐकून घेऊन, ते सोडविण्याचा प्रयत्न करत असते. ते तर लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना करणे काहीच गैर नाही. 

पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत आपले नियोजन कसे असेल? 
- मुळात या समितीचे तात्पुरते अध्यक्षपद हे आकस्मिक पाणीपुरवठा करण्यापुरते मर्यादित असते. यानुसार शहर किंवा जिल्ह्यात ज्या ठिकाणी तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल, अशा ठिकाणी पाणीपुरवठा करणे क्रमप्राप्त असते; परंतु, यंदा खूपच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने, अशी स्थिती कुठेच नाही. पुणे शहराला प्रतिवर्षासाठी ११.३ टीएमसी पाणीसाठा मंजूर आहे. प्रत्यक्षात महापालिका याहूनही कितीतरी अधिक पाण्याचा वापर करत आहे. शहराला आणि शेतीलाही पुरेसा पाणीपुरवठा करणे, हे माझे पहिले कर्तव्य असणार आहे. 

हंगामी अध्यक्ष या नात्याने आपण वर्षभराच्या पाणी वाटपाचे नियोजन करणार आहात का? आपण केलेले नियोजन सरकार अस्तित्वात आल्यानंतर कायम राहू शकते का? 
- नाही. गरजूंना गरजेनुसार पाणी उपलब्ध करून देणे, हे तात्पुरती नियुक्‍ती केलेल्या अध्यक्षांचे काम असते. त्यामुळे मी अध्यक्ष या नात्याने वर्षभराच्या पाणी वाटपाचे नियोजन करणार नाही. दरमहा, गरजेनुसार, त्यात बदल केला जाईल. शिवाय, सरकार अस्तित्वात आल्यानंतर नव्या अध्यक्षांना म्हणजेच संभाव्य पालकमंत्र्यांना ते बदलण्याचा अधिकार असतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com