Pune Rains : जिल्हाधिकाऱ्यांसमोर पूरबाधितांचा संताप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

या घटनेच्या दोन दिवसांनंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या भागाची पाहणी करत मदतीचे आश्वासन दिले. मात्र, प्रशासकीय मदत वेळेवर न मिळाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

पुणे  - आंबिल ओढ्याची संरक्षण भिंत पडून ओढ्याचे पाणी अरण्येश्‍वर परिसरात शिरल्याने सहा जणांना प्राण गमवावा लागला. शेकडो घरांमध्ये पाणी साचल्याने संसाराचा चिखल झाला आहे. या घटनेच्या दोन दिवसांनंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या भागाची पाहणी करत मदतीचे आश्वासन दिले. मात्र, प्रशासकीय मदत वेळेवर न मिळाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

बुधवारी (ता. २५) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने कात्रज येथील पेशवे तलाव भरला, त्यामुळे आंबिल ओढ्याला मोठा पूर आला. त्यात अनेक भागांत ओढ्याची संरक्षक भिंत कोसळून नागरिकांच्या घरांत पाणी शिरले. अरण्येश्वर भागातील तावरे कॉलनी, टांगेवाला कॉलनी आणि पर्वती भागात ओढ्याच्या पुराचे पाणी घरांमध्ये शिरले. काही या भागात सुमारे दहा फुटांपर्यंत पाणी होते. त्यात परिसरातील सहा लोकांचा मृत्यू झाला. वेळेत प्रशासनाची मदत मिळाली नसल्याने जिल्हाधिकारी राम यांच्यासमोर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. राम यांनी परिसरातील पूरस्थितीची पाहणी केली. स्थानिकांशी चर्चा करून झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. तसेच, लवकरात लवकर मदतीचे आश्वासन दिले. दरम्यान, आंबिल ओढ्याच्या बाजूच्या बेकायदा बांधकामाची माहिती घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

परिसरातील सुमारे ७० घरांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. बाधित घरांचे पंचनामे करण्यात येत आहेत. प्रशासनाकडून पूरग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: collector visit flood affected aera