'सर्व्हर डाऊन'चा दाखल्यांवर होतोय परिणाम! (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

तांत्रिक बाबींमुळे सर्व्हर डाउनची समस्या निर्माण होत आहे, त्यामुळे काही प्रमाणात विलंब होत असेल. मात्र जातीचा व रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र त्वरित देण्याबाबत केंद्रांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. तरीही विलंब होत असेल तर संबंधित केंद्रांची तपासणी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल. 
- जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी

पुणे - वेळोवेळी होणारे सर्व्हर डाउन, विजेचा खोळंबा आणि ऐनवेळी घेऊन येण्यास सांगितली जाणारी विविध कागदपत्रे, यामुळे प्रवेशासाठी आवश्‍यक असलेले दाखले मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थी आणि पालक हैराण झाल्याचे चित्र सध्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये दिसत आहे.

कोणत्याही दाखला, प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यास ते मिळण्यास किमान तीस दिवसांचा कालावधी जात आहे. मात्र, महाविद्यालये सुरू होणार असल्याने दाखले त्वरित जमा करा, अशी मागणी महाविद्यालय प्रशासनाकडून होत आहे.

त्यामुळे आता काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला आहे. 
महा ई-सुविधा केंद्रांमध्ये (सेतू) आल्यानंतर कागदपत्रांची छाननी करणे, अर्ज करणे, तो अपलोड करणे आणि शेवटी अर्जाची पावती मिळण्यात पाच ते सहा तासांचा कालावधी जात आहे. त्यातच सर्व्हर डाउन किंवा विजेचा खोळंबा झाल्यास दोन ते तीन दिवस चकरा मारूनदेखील अर्जाची प्रक्रिया होत नसल्याचे अनेकांच्या बाबतीत घडले आहे. 

अर्जात त्रुटी असल्याचा मेसेज महाऑनलाइनकडून अर्जदाराला पाठवला जातो. मात्र, त्यात नेमक्‍या काय त्रुटी आहेत, याचा एसएमएसमध्ये उल्लेख नसतो. सेतूमधील वेळखाऊ प्रक्रिया, आवश्‍यक कागदपत्रांबाबत स्पष्टता नसणे, मूलभूत सुविधांचा अभाव, अशा अनेक समस्यांना विद्यार्थी व पालकांना सामोरे जावे लागत आहे. दाखले, प्रमाणपत्रे द्यावीत; आवश्‍यक कागदपत्रे केंद्रात नमूद करावीत, प्रत्येकवेळी मूळ कागदपत्रांचा आग्रह नको, एसएमएस सुविधेत बदल करावा, टोकनची यंत्रणा सुरू करावी, वीज व संगणकीय त्रुटी दूर कराव्यात आणि महत्त्वाचे म्हणजे दाखले जमा करण्यासाठी महाविद्यालयांनी मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: College Admission Student Certificate Problem Student Parent