विद्यार्थ्यांनो एकाच हप्त्यात सर्व शुल्क भरा; नाहीतर पुढच्या वर्गात प्रवेश देणार नाही' 

college.jpg
college.jpg

पुणे : शहरात शाळांनी पालकांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावलेला असताना आता महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना एकाच हप्त्यात सर्व शुल्क भरा, नाही तर पुढच्या वर्गात प्रवेश देणार नाही, अशी दमबाजी सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याविरोधात विद्यापीठाकडे तक्रारी करत सुट देण्याची मागणी केली आहे. 

'कोरोना'मुळे प्रथम वर्ष वगळता इतर वर्षाचे वर्ग आॅगस्ट महिन्यात आॅफलाईन व आॅनलाईन पद्धतीने सुरू करण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत. विद्यापीठाने निकाल लावण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. शहरातील महाविद्यालयांनी द्वितीय वर्ष,  तृतीय वर्षाचे प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन सुरू केली आहे. यामध्ये अनेक महाविद्यालयात अनुदानित व विना अनुदानित वर्ग आहेत. पारंपरिक बीएससी, बीकाॅम, बीए या अभ्यासक्रमांचे शुल्क कमी आहे. तर, बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए यासह इतर  व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क ३५ ते ४० हजाराच्या पुढे आहे. या विद्यार्थ्यांना जुलै महिन्याच्या आतच संपूर्ण शुल्क भरावे असे आदेश देण्यात आले आहेत. 

कोरोनामुळे बहुतांश विद्यार्थ्यांच्या घरचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. त्यामुळे ते संपूर्ण शुल्क एकाच वेळी भरणे अशक्य आहे. त्यामुळे विद्यार्थी गडबडून गेले आहेत. शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, तसेच हप्त्यांमध्ये शुल्क भरता आले पाहिजे अशी मागणी करत महाविद्यालयांना ईमेल पाठवत आहेत. मात्र अद्याप त्यांना दिलासा मिळालेला नसल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत. 

"शिवाजीनगर परिसरातील एका महाविद्यालयात बीसीए द्वितीय वर्षाला आहे. वर्षभराचे शुल्क ३६ हजार रुपये आहे. हे एक रकमी मला भरता येणार नाही, असा अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी सद्यस्थिती पाहून सवलत दिली पाहिजे.- एक विद्यार्थी. 

 मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकर्यांची मुले पुण्यात शिक्षणासाठी येतात. त्यांच्यावर आर्थिक संकट आहे, अनेकांना दुबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे एकदम शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सवलत द्यावी अशी मागणी पुणे विद्यापीठाकडे केली आहे.-आकांक्षा चौगुले, अध्यक्ष,  स्टुडंट हेल्पींग युनिटी. 

"ज्या विद्यार्थ्यांना पैसे भरणे शक्य आहे त्यांनी भरावेत, ज्यांना शक्य नाही अशांसाठी महाविद्यालयांनी हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सवलत दिली पाहिजे. -डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com