येरवड्यात उभारणार कैद्यांसाठी वसाहत

दिलीप कुऱ्हाडे 
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

कैद्यांची सुधारणा व पुनर्वसनाकरिता येरवड्यातील मुळा नदीकाठावर राज्यातील दुसरी खुली वसाहत उभारण्यात येणार आहे.

येरवडा - कैद्यांची सुधारणा व पुनर्वसनाकरिता येरवड्यातील मुळा नदीकाठावर राज्यातील दुसरी खुली वसाहत उभारण्यात येणार आहे. या वसाहतीत कैद्यांना कुटुंबासह राहता येईल. हे कैदी आउटसोर्स केलेल्या सेवा उद्योगात किंवा बाहेर जाऊन काम करणार असल्याची माहिती अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी दिली.

आटपाडी (जि. सांगली) येथील कैद्यांच्या खुल्या वसाहतीवरून प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी १९५७ मध्ये ‘दो आँखे बारा हाथ’ हा चित्रपट काढला होता. हा चित्रपट देश-विदेशात खूप गाजला. या वसाहतीची संकल्पना देशातील अनेक राज्यांनी राबविली. त्यानंतर सात दशकांनंतर राज्यातील दुसरी कैद्यांची खुली वसाहत येरवड्यात उभारण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. 

रामानंद म्हणाले, ‘‘येरवड्यातील ही खुली वसाहत वेगळी असणार आहे. शहरातील जागेचा विचार करता कैद्यांना इमारतीमधील लहान सदनिका मिळणार आहेत. सध्या खुल्या कारागृहात असणाऱ्या महिला किंवा पुरुष कैदी आपल्या कुटुंबासह या लहानशा सदनिकेत राहणार आहेत.  या कैद्यांना मध्यवर्ती किंवा खुल्या कारागृहातील शेती, वस्त्रनिर्मिती, लोहारकाम, सुतारकाम, फळ प्रक्रियासह सेवा उद्योगांतील कौशल्य मिळाल्यामुळे त्यांना खुल्या वसाहतीमध्ये अडचण येणार नाही.’’

नदीकाठावर येरवडा खुल्या कारागृहाची शेती आहे. येथे पूर्वी कैदी काम करीत असत. या ठिकाणची पाहणी करून खुल्या वसाहतीचा प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविला आहे. हा देशातील अभिनव उपक्रम आहे.
- सुनील रामानंद,  कारागृह महानिरीक्षक

महिला खुल्या कारागृहासाठी लवकरच इमारती बांधणार  
देशातील पहिले महिला खुले कारागृह अकरा वर्षांपूर्वी येरवड्यात सुरू झाले. कारागृहातील महिला कैदी दिवसातील काही तास शेतीकाम करत. सायंकाळ होताच त्यांना बराकीमध्ये बंद केले जात होते. मात्र, आता या महिलांना खुल्या वातावरणात राहता यावे, यासाठी लवकरच अकरा इमारती बांधण्यात येणार आहेत. यामध्ये सुमारे सहाशे महिला कैद्यांची राहण्याची सोय केली जाणार असल्याची माहिती रामानंद यांनी दिली.  

राज्यात पुरुष कैद्यांसाठी खुले कारागृह होते. मात्र, महिला कैद्यांसाठी असे कारागृह नव्हते. तत्कालीन कारागृह महासंचालक उद्धव कांबळे यांच्या प्रयत्नाने महिला खुल्या कारागृहाला मान्यता मिळाली. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते या कारागृहाचे १५ ऑगस्ट २००८ रोजी उद्‌घाटन करण्यात आले होते. रामानंद यांनी कारागृहाचा पदभार घेताच त्यांनी महिला खुल्या कारागृहासाठी प्रस्ताव तयार केला आहे. 

या संदर्भात रामानंद व कारागृहाच्या अधीक्षक स्वाती जोगदंड यांनी सांगितले, की महिला खुल्या कारागृहातील शेतजमिनीत अकरा इमारती बांधण्यात येणार आहेत. यामध्ये ४४ बराकी असून, त्यामध्ये प्रत्येक बराकीत १४ महिला कैदी राहणार आहेत. यासाठी पाच कोटी रुपये खर्च येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Colony for prisoners in Yerawada