शिस्तबद्ध संचलन अन्‌ हेलिकॉप्टरमधून मानवंदना 

शिस्तबद्ध संचलन अन्‌ हेलिकॉप्टरमधून मानवंदना 

पुणे - ""सैन्य दलांमधील परस्पर सहकार्य वाढविणे आणि दशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी कौशल्य आत्मसात करणे, हा लष्कराच्या संयुक्त सरावाचा उद्देश आहे. यातून कोणत्याही देशाला आव्हान देण्याचा प्रयत्न नाही,'' असे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी स्पष्ट केले. 

"बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फोर मल्टि सेक्‍टरल टेक्‍निकल ऍण्ड इकॉनॉमिक को-ऑपरेशन' (बिमस्टेक) संघटनेच्या सदस्य राष्ट्रांचे "मिलेक्‍स' या संयुक्त लष्करी सरावाचे पुण्यात 10 ते 16 सप्टेंबरदरम्यान आयोजन केले होते. याच्या समारोपप्रसंगी डॉ. भामरे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी जनरल बिपिन रावत उपस्थित होते. 

लष्करी बॅंडच्या सुरातील शिस्तबद्ध संचलन आणि राष्ट्रध्वजाला हेलिकॉप्टरमधून देण्यात आलेली मानवंदना अशा वातावरणात "बिमस्टेक' सदस्य राष्ट्रांच्या "मिलेक्‍स' या संयुक्त लष्करी सरावाचा रविवारी समारोप झाला. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत, "बिमस्टेक'चे सचिव शाहिदुल इस्लाम तसेच सदस्य राष्ट्रांचे सैन्यदलप्रमुख उपस्थित होते. या सरावामध्ये भारतासह भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका या राष्ट्रांच्या सैनिकी तुकड्यांचा तर थायलंड आणि नेपाळ या राष्ट्रांच्या निरीक्षक अधिकाऱ्यांचा सहभाग होता. 

डॉ. भामरे म्हणाले, ""बिमस्टेक संघटनेच्या माध्यमातून चीन किंवा इतर कोणत्याही देशाविरुद्ध आघाडी उघडण्याचा प्रयत्न नाही. ही विभागीय सहकार्य करणारी संघटना आहे. सदस्य राष्ट्रांमध्ये पर्यावरण, शेती, माहिती व तंत्रज्ञान, आर्थिक सहकार्य, गरिबीपासून मुक्तता, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विषयांवर ही संघटना कार्य करते. गेल्या काही वर्षांमध्ये दहशतवादाचा धोका वाढत आहे. या लढ्यात परस्परांचे सहकार्य वाढविण्यासाठी हा सराव आयोजित केला होता.'' 

आगामी काळात अशा प्रकारच्या सरावाची आवश्‍यकता, त्यासाठी आवश्‍यक सुविधा अशा विविध विषयांवर चर्चा करून या सरावाची पुढील दिशा ठरविली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

इस्लाम म्हणाले, ""अशा प्रकारचा सैनिकी अभ्यास करण्यासाठी भारत सरकारचे आभार व्यक्त करतो. सुरक्षा क्षेत्रात भारताने दिलेल्या वचनाचे पालन केले आहे. हा सराव हे एकत्रित सहकार्याचे प्रतीक आहे. त्यामुळे आगामी काळात या सरावाचा नक्कीच फायदा होईल. तसेच सदस्य राष्ट्रांना दहशतवादविरोधी यंत्रणा उभारण्यात मोलाची मदत याद्वारे मिळणार आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com