यंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार

piff
piff

पुणे  : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या 'पिफ'ची प्रमुख 'थीम' असून त्याअंतर्गत महोत्सवात महात्मा गांधी यांना चलचित्र आदरांजली वाहण्यात येणार आहे. महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

''राज्याचा अधिकृत चित्रपट महोत्सव असलेल्या व दरवर्षी सिनेप्रेमींच्या उत्सुकतेचा विषय  ठरणाऱ्या ‘पिफ’ मध्ये यावर्षी ११४ देशांमधून १६३४ चित्रपट प्राप्त झाले होते. यातील निवडक असे १५० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. चित्रपटांबरोबरच चित्रपटांशी संबंधित विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रदर्शन यांचाही महोत्सवात अंतर्भाव असेल.'',असेही डॉ. पटेल यांनी यावेळी नमूद केले. महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, ‘पिफ’चे निवड समिती सदस्य मकरंद साठे, सतीश आळेकर, अभिजित रणदिवे यावेळी उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पुण्यात ४ ठिकाणी १० स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. यात पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड, सिटी प्राईड सातारा रस्ता, सिटी प्राईड मंगला आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) या चित्रपटगृहांचा समावेश आहे.

या वेळी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “महात्मा गांधी यांचे योगदान केवळ भारतीय स्वातंत्र्यलढ्यापुरतेच मर्यादित नाही. त्यांच्या विचारांचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे. अनेक भारतीय आणि जागतिक चित्रपटांमधून त्याचा प्रत्यय येतो. या वर्षी महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनावरील आणि शिकवणीवरील काही जागतिक दर्जाचे चित्रपट ‘पिफ’मध्ये पाहायला मिळतील.’’

'पिफ' मधील चित्रपट विभाग 

स्पर्धात्मक विभाग 
१) वर्ल्ड काँपिटिशन
२) मराठी काँपिटिशन

इतर विभाग
१) पुरस्कारार्थी
२) विद्यार्थी विभाग- ‘लाईव्ह ऍक्शन’ आणि ‘ऍनिमेशन’
३) थीम-'इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी
४)  माहितीपट
५)  देश विशेष- (कंट्री फोकस)
६)  ट्रिब्यूट
७)  आशियाई चित्रपट
८)  जागतिक चित्रपट
९)  सिंहावलोकन (रेट्रोस्पेक्टिव्ह)
१०) भारतीय चित्रपट
११) आजचा मराठी चित्रपट
१२) विशेष स्क्रीनिंग
१३) कॅलिडोस्कोप

या महोत्सवातील चित्रपट पाहण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची माहिती www.piffindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ११ डिसेंबरपासून या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीस सुरूवात होणार आहे. सिनेप्रेमींनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांना मिळालेल्या नोंदणी क्रमांकासह सिटी प्राईड- कोथरूड, सिटी प्राईड- सातारा रस्ता किंवा सिटी प्राईड मंगला चित्रपटगृह येथे जाऊन 'स्पॉट रजिस्ट्रेशन' करणे अपेक्षित आहे. हे स्पॉट रजिस्ट्रेशन २० डिसेंबरपासून सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळात करता येणार आहे. १८ वर्ष पूर्ण असलेले विद्यार्थी, 'फिल्म क्लब'चे सभासद व ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील) यांना ओळखपत्र दाखवून रुपये ६०० मध्ये नोंदणी करता येणार आहे, तर इतर इच्छुकांसाठी नोंदणी शुल्क रुपये ८०० इतके आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com