पाण्याच्या वक्‍तव्यावरून महाजन यांच्यावर टीका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

पुणे - जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुणेकरांच्या पाणी वापराबाबत केलेल्या वक्तव्यावर राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांकडून प्रतिक्रिया उमटल्या. पुण्याच्या पाण्याचे "ऑडिट' करण्याचा सल्ला देणाऱ्या जलसंपदा विभागाने त्यांच्या पायाखाली काय जळत आहे, याची माहिती घ्यावी, अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे. 

पुणे - जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुणेकरांच्या पाणी वापराबाबत केलेल्या वक्तव्यावर राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांकडून प्रतिक्रिया उमटल्या. पुण्याच्या पाण्याचे "ऑडिट' करण्याचा सल्ला देणाऱ्या जलसंपदा विभागाने त्यांच्या पायाखाली काय जळत आहे, याची माहिती घ्यावी, अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे. 

पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी मंत्री महाजन यांनी पुण्याच्या पाणीवापरावर ऑडिट करण्याचा सल्ला दिला. यावर सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि विश्‍वास सहस्रबुद्धे यांनी टीका केली. महापालिका आणि जलसंपदा विभागात 1999 मध्ये साडेअकरा टीएमसी पाणी वापराचा करार झाला. गेल्या वीस वर्षांत पुण्याची लोकसंख्या दुपटीने वाढली. त्यानंतर नव्याने जलसंपदा विभागाने करार केला नाही. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुणेकरांचे शंभर कोटी रुपये खर्च झाले आहेत. मुंढवा जॅकवेल येथून प्रतिवर्षी साडेसहा टीएमसी पाणी शेतीसाठी घेण्याची व्यवस्था केली आहे. निम्मे पाणीदेखील जलसंपदा विभाग घेऊ शकले नाही. बेबी कालव्याची दुरवस्था झाली आहे. खडकवासला धरण ते पुण्यापर्यंत पाणी आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पुणेकरांनी बंद पाइपलाइन केली. त्याचवेळी जलसंपदा मुठा कालव्यातील पाण्याची गळती जलसंपदा विभाग रोखू शकला नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी 100 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी या कामासाठी निधी नाकारला. याच कामाचे उद्‌घाटन त्यांच्या मंत्र्यांनी केल्याची टीका कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी केली. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी या जलशुद्धीकरण केंद्राच्या कामास आमच्या कालावधीत सुरवात झाली; भाजपने केवळ कामाचे उद्‌घाटन केल्याकडे लक्ष वेधले. 

Web Title: Commenting on girish mahajan statement on water