वाणिज्यमध्ये ‘कौशल्य’वर भर

Savitribai-Phule-University
Savitribai-Phule-University

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम बदलला आहे. यात प्रमुख भर रोजगार क्षमतावृद्धी, उद्योजकता व कौशल्य विकासावर आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमात मूलगामी स्वरूपाचे बदल करण्यात आले असून, या बदलांमुळे विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास होऊ शकेल. तसेच, प्रत्येक महिन्याला एक परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती वाढेल.

नवीन पुनर्रचित अभ्यासक्रम पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धतीनुसार (चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिम) तयार करण्यात आला आहे. या वर्षीपासून तो सर्व महाविद्यालयांसाठी लागू असेल. नव्या रचनेनुसार अभ्यासक्रमासाठी १३२ श्रेयांक असतील. विद्यार्थी त्यांच्या पसंतीचे विषय निवडू शकतात. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार विविध अल्पमुदतीचे अभ्यासक्रम निवडून अधिकचे श्रेयांक प्राप्त करू शकतात. या अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य तसेच रोजगार क्षमता वाढविण्यासाठी उपयोग होईल. विद्यार्थ्यांना परदेशी वा देशांतर्गत एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात प्रवेश घेताना श्रेयांक पद्धतीमुळे समकक्षता प्राप्त झाल्याने प्रवेश प्रक्रिया सुलभ होईल.

विद्यार्थी एकच अभ्यासक्रम एकापेक्षा जास्त संस्थातून पूर्ण करू शकतात. विविध शासकीय, निमशासकीय अथवा खासगी संस्थांना नोकरीसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शास्त्रीय पद्धतीने करणे सुलभ होईल. अभ्यासक्रम सातत्याने अद्ययावत केल्याने शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणे शक्‍य होणार आहे. नव्या अभ्यासक्रमाच्या मूल्यमापन प्रक्रियेसाठी समूह चर्चा, प्रकल्प, संगणकाधारित सादरीकरण (पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन), लेखी परीक्षा, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा, प्रश्नमंजुषा, चाचणी, मौखिक परीक्षा या पद्धतींचा वापर केला जाणार आहे. 

वैशिष्ट्यपूर्ण परीक्षा
सहयोगी अधिष्ठाता डॉ. यशोधन मिठारे याबाबत म्हणाले, ‘‘रोजगार व कौशल्यवृद्धीवर आधारित अभ्यासक्रम तयार करताना व्यापार व उद्योग क्षेत्रातील विविध तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यात आली. या रचनेत सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केल्याने प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यास एक या प्रमाणे एकूण चार परीक्षा द्याव्या लागणार आहेत. यापैकी तीन परीक्षा या अंतर्गत मूल्यमापन या स्वरूपाच्या असून, एक परीक्षा विद्यापीठामार्फत घेतली जाणार आहे. एका वर्षात विद्यार्थ्यास दोन सत्रांच्या एकूण आठ परीक्षा देणे आवश्‍यक आहे. ’’
(उद्याच्या अंकात - कला शाखा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com