
सी-मेटच्या वर्धापनदिनी आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरवात
पुणे : डिजिटल इंडियासाठी भारतात ज्ञानाधारीत अर्थव्यवस्था उभी राहणे गरजेचे आहे. स्मार्ट फोनच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारत आता जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. डिजिटल इंडियाची मोहीम वेगवान करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादने हा मुख्य घटक असून, त्यासाठी प्रयोगशाळेतील उत्पादनांचे व्यावसायिकीकरण करणे आव्हानात्मक आहे, असे मत केंद्रातील इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केले.
पाषाण येथील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) च्या व्हर्च्युअल वर्धापण दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के..सारस्वत, मंत्रालयाचे सचिव अजय सावनी, विशेष सचिव (अर्थ) ज्योती अरोरा, दक्षिण कोरियातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. रेडनी रॉफ, सी-मेटचे महासंचालक डॉ. भारत काळे, समन्वयक डॉ. रणजित हवालदार, डॉ. सुधीर अरबुज आदी उपस्थित होते. वर्धापनदिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्थविज्ञान परिषदेचे उदघ्टानही यावेळी करण्यात आले. भारत हा जगाच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे केंद्र बनावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे धोत्रे म्हणाले. डॉ. भटकर म्हणाले,‘‘सॉफ्टवेअर उत्पादनाच्या बाबतीत भारत जरी पुढे असला तरी हार्डवेअरच्या बाबतीत आपण अजूनही मागे आहोत. हार्डवेअरचे उत्पादन हे पदार्थतंत्रज्ञानावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला पदार्थ विकासावर विशेष लक्ष केंद्रित करायला हवे.’’ भविष्यकालीन शाश्वत ऊर्जापर्याय म्हणून न्यूट्रूनो एनर्जीकडे पाहिले जात असून, सी-मेटने यात सहभाग घेणे देशासाठी अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले. डॉ. सारस्वत यांनी इलेक्ट्रॉनिक्स मटेरिअल उत्पादनात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. वर्धापनदिनानिमित्त डॉ. रॉफ यांनी ग्राफिनवर विशेष व्याख्यान दिले.
डॉ. सारस्वत म्हणाले...
- इलेक्ट्रॉनिक्स पदार्थांवरील काम उल्लेखनीय असले तरी आपण खूप मागे
- इलेक्ट्रॉनिक्ससाठी लागणाऱ्या पदार्थांची मोठ्या प्रमाणावर आयात होते
- देशातील फोटोव्होल्टाईक, सेमिकंडक्टर बाजारपेठेला पदार्थांची आवश्यकता
- एनर्जी मटेरिअल, ग्राफिन, सेन्सर, सिलिकॉन कार्बाईड, आयओटी डिव्हायसेसच्या उत्पादनात वाढ
- सरकार, उद्योग आणि संशोधन संस्थांनी यात अधिक लक्ष घालायला हवे