‘लाचलुचपत’तर्फे आयुक्‍तांची चौकशी करा - खासदार श्रीरंग बारणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्वीय सहायक व प्रत्यक्षात स्टेनो या पदावर गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या राजेंद्र शिर्के याला बांधकाम व्यावसायिकाकडून १२ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. यामुळे पुन्हा महापालिकेतील भ्रष्टाचार समोर आला आहे. याप्रकरणी आयुक्‍त दिनेश वाघमारे यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे चौकशी करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्वीय सहायक व प्रत्यक्षात स्टेनो या पदावर गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या राजेंद्र शिर्के याला बांधकाम व्यावसायिकाकडून १२ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. यामुळे पुन्हा महापालिकेतील भ्रष्टाचार समोर आला आहे. याप्रकरणी आयुक्‍त दिनेश वाघमारे यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे चौकशी करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

महापालिका आयुक्‍तांचा स्वीय सहायक शिर्के हा या भ्रष्टाचाराचा म्होरक्‍या नसून महापालिका आयुक्तच याचे पाठीराखे आहेत. आयुक्त दिनेश वाघमारे ही लाच स्टेनोकरवी घेत असल्याने त्यांची चौकशी करून त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उपायुक्‍त सरदेशपांडे यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार या महापालिकेत आतापर्यंत झाला आहे. बांधकाम व्यावसायिकांना वेठीस धरून राजरोसपणे पैशांची मागणी होत असून, सायंकाळानंतर बांधकाम विभाग व नगररचना विभागामध्ये चालू असलेली कामे हा या महापालिकेतील भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू आहे. नगररचना विभागातील कर्मचाऱ्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत कोणीही पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाही आणि प्रत्येकाचे विशिष्ट दर ठरलेले आहेत. बांधकाम विभागातही सर्रास सामान्यांपासून ते मोठ्या बांधकाम व्यावसायिकांपर्यंत अडवणूक करून छोट्या- मोठ्या त्रुटी काढून नागरिकांना त्रास देऊन पैशांची मागणी केली जाते. पैसे घेणाऱ्यांची व पैसे पोच करणाऱ्यांची एक प्रकारची साखळीच आहे. महापालिकेचे प्रमुख अधिकारी ते महापालिका आयुक्त हे या सर्व भ्रष्टाचारामध्ये सहभागी असल्याचे बारणे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

वाघमारे यांच्या पदोन्नतीला स्थगिती द्या - अमोल थोरात

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्वीय सहायक राजेंद्र शिर्के याने १२ लाखांची लाच स्वीकारल्याचे प्रकरण समोर आले आहे. वाघमारे यांच्यासह काही बड्या अधिकाऱ्यांच्या पाठबळावरच शिर्के याने लाच स्वीकारण्याची हिंमत केली असून, या प्रकरणी शिर्केची नार्को चाचणी करण्यात यावी, तसेच वाघमारे यांच्या पदोन्नतीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

थोरात यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी आयुक्‍त वाघमारे यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, राजेंद्र शिर्केची नार्को चाचणी आणि फोन कॉलची तपासणी करावी, तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा भ्रष्टाचार समोर आला आहे. शिर्के कोणत्या व्यक्तींना किती वेळा भेटला, अशा व्यक्ती महापालिकेत का आल्या होत्या, वाघमारे यांच्यासह कोणत्या अधिकाऱ्यांशी शिर्के याचा संपर्क असायचा, किती व्यक्तींकडून शिर्केने लाच घेतली आहे, किती जणांना लुबाडले आहे, अशा अनेक बाबींची चौकशी होणे आवश्‍यक आहे. तसेच शिर्के याचे फोन कॉल्स आणि त्याचे कॉल रेकॉर्डिंगचीही सविस्तर तपासणी आणि चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

Web Title: commissioner inquiry by bribe department