गोरगरिबांच्या मुलांना आपले समजून शिकवा - आयुक्त श्रावण हर्डीकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

पिंपरी - ‘‘तुमची मुले चांगल्या शाळेत जातात. त्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे, असे तुम्हाला वाटते, मग महापालिकेच्या शाळेत येणारी गोरगरिबांची मुले आपलीच मुले आहेत, असे समजून त्यांना का शिकवले जात नाही,’’ असा प्रश्‍न महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘शिक्षण समृद्धी’ या कार्यशाळेत शिक्षकांना मंगळवारी विचारला. त्यांनी एकापाठोपाठ एक प्रश्‍न विचारत ‘महापालिका शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करा’, अशी सूचना केली. 

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने ‘शिक्षण समृद्धी’ कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत आयुक्तांनी उपस्थित शिक्षक व मुख्याध्यापकांशी संवाद साधला. या वेळी महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, सभागृह नेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे, उपसभापती शारदा बाबर, सदस्या अश्‍विनी चिंचवडे, प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे, सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे उपस्थित होते. 

हर्डीकर म्हणाले, ‘‘शाळेची पटसंख्या ही समाजमनाचे प्रतीक आहे. नेमके हेच प्रतीक आपले वर्षागणिक उतरणीच्या मार्गावर आहे. गेल्या पाच वर्षांत पन्नास हजारांवरून ३६ हजारपर्यंत पटसंख्या रोडावली आहे. अशीच पटसंख्या घटत राहिली, तर मला नव्याने शिक्षक भरती करण्याची गरज लागणार नाही. शिक्षकांनी स्वत:ची तत्त्व जपली पाहिजेत. खासगी शाळांमधील शिक्षक कमी पगारावर काम करतात, पण गुणवत्तेच्या बाबतीत ते मागे पडत नाहीत. पालिका शाळेतील शिक्षकांनी मनाचा कोडगेपणाचा मुखवटा फाडून काढला पाहिजे. शिक्षकांनी कृतीयुक्त शिक्षण पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याकडे कल वाढला.’’

महापौरांचे शिक्षकांना खडेबोल
महापौर राहुल जाधव यांनी शाळांचा पाहणी दौरा केला होता. त्याची या वेळी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. महापौर म्हणाले, ‘‘शिक्षक राजकारण करत नसतो; तर तो ज्ञानदानाचे कार्य करतो. या ठिकाणी तर शिक्षकच राजकारणात अडकल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे कामाला लागा; अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील,’’ असे खडेबोल सुनावल्यामुळे शिक्षकांमध्ये कुजबूज सुरू झाली.

Web Title: Commissioner Shravan Hardikar Talking