कोल्हापूर साफ करण्यासाठी आयुक्तांनी हातात घेतला झाडू

कोल्हापूर साफ करण्यासाठी आयुक्तांनी हातात घेतला झाडू

पुणे : स्वतः नाले साफ करणारा, शहरातील घाण काढणारा महापालिका आयुक्त कोणी पाहलाय? ते देखील केवळ फोटोशूटसाठी नाही तर एक व्रत म्हणून सफाईचे काम हाती घेणारा तर सापडणे विरळाच. पूराने वेढलेल्या कोल्हापूरमध्ये मल्लिनाथ कलशेट्टी हे स्वतः कचरा उचलत असल्याचा फोटो सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.

केवळ पूर आला म्हणून कलशेट्टी यांनी हाती झा़डू घेतलेला नाही. तर ते आधीपासूनच सलग गेले अकरा रविवार ते स्वच्छता कर्माचाऱ्यांसोबत रस्ते झाडत आहेत. कचरा उचलत आहेत. पूराने अस्वच्छ झालेल्या कोल्हापूरमध्ये कलशेट्टी यांच्या या सफाईची दखल सोशल मिडियाने घेतली नाही तरच नवल.

अर्थात कलशेट्टी यांचे हे पहिलेच असे काम नाही. ते जिथे जातील तेथे असेच काम करतात. राज्यात चर्चेत आलेल्या संत गाडगेबाब स्वच्छता अभियानाचे ते पहिले समन्वयक होते. तत्कालीन ग्रामविकासमंत्री आर. आर. पाटील यांच्या कल्पनेतून निघालेल्या या अभियानाला गती देण्याचे काम कलशेट्टी यांनी केले. तेव्हा हाती घेतलेला झाडू कलशेट्टी यांनी सोडलेला नाही.

त्यांनी नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांनी तेथेही झोकून काम केले. त्यांच्या कामांमुळे एका वस्तीचा वर्षानुवर्षेचा प्रश्न मार्गी लागला. तेथील रहिवाशांनी आपल्या वस्तीला कलशेट्टीनगर असे नाव दिले. एखाद्या अधिकाऱ्याचा असा गौरव होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असावी.

याच कलशेट्टी यांनी सुटीच्या दिवशी सलग 11 रविवार सफाईसाठी कोल्हापूरच्या रस्त्यांवर उतरले. पुरानंतर परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. ती सावरण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात कलशेट्टी यांच्या कृतीप्रधान सहभागाचा मोठा वाटा आहे.

याबाबत `सरकारनामा`शी बोलताना ते म्हणाले,``खरे तर आपण स्वतः काम केले की आपल्या सहकाऱ्यामध्येही प्रेरणा निर्माण होते. काही गोष्टी केवळ भाषणांमधून समजावून सांगता येत नाहीत. त्यासाठी स्वतः आघाडीवर राहून काम करावे लागते. तो माझा मूळचा पिंड आहे. मी वेगळे काही करत नाही. माझ्या सहकाऱ्यांना कोणत्या परिस्थितीत काम करावे लागते, याचीही मला कल्पना येते. त्यांच्याही अडचणी दूर होतात. कामाला वेग येतो.``

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com