शहर विकासासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध  - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

पिंपरी - ""भ्रष्टाचाराचे आरोप करून राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचा विरोधकांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र त्यामुळे शहरातील जनतेच्या विश्‍वासाला तडा जाणार नाही. शहर विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून, त्या दृष्टीने काम करण्यावर आमचा भर आहे,'' अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. 

पिंपरी - ""भ्रष्टाचाराचे आरोप करून राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचा विरोधकांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र त्यामुळे शहरातील जनतेच्या विश्‍वासाला तडा जाणार नाही. शहर विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून, त्या दृष्टीने काम करण्यावर आमचा भर आहे,'' अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. 

शहरातील सुमारे 60 कोटी रुपयांच्या एकूण 14 विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटनानिमित्त पवार शहरात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. दापोडी येथील भुयारी मार्ग व थेरगाव गावठाणाच्या कमानीचे भूमिपूजन, चिंचवडगावातील जिजाऊ पर्यटन केंद्र, संत तुकारामनगरमधील बहुउद्देशीय इमारत, "संस्कार' आणि "बेटी बचाओ' शिल्पाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. प्रातिनिधिक स्वरूपात काही फेरीवाल्यांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. मासुळकर कॉलनीतील उद्यान, काळभोरनगरमधील गाय वासरू शिल्पाचे अनावरण आणि आकुर्डी-गणेश व्हिजन शेजारील उद्यानाचे त्यांनी भूमिपूजन केले. 

खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार अण्णा बनसोडे, महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल, अपर्णा डोके, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, फ प्रभाग अध्यक्षा मंदाकिनी ठाकरे, क्रीडा समितीचे सभापती समीर मासुळकर, नगरसेवक ऍड. संदीप चिंचवडे, नीलेश बारणे, नारायण बहिरवाडे, अनंत कोऱ्हाळे, कैलास थोपटे, नगरसेविका शमीम पठाण, अश्‍विनी चिंचवडे, सुजाता पालांडे आदी या वेळी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""विविध विकासकामांच्या निविदा 10 टक्के कमी दराने मंजूर होतात. तरी, भ्रष्टाचाराचे आरोप का होतात, हे समजत नाही. अधिकाऱ्यांनी जनतेच्या कररूपाने आलेल्या पैशांचा हिशेब ठेवावा. भ्रष्टाचाराला अजिबात थारा देऊ नये.'' 

स्मार्ट सिटीसाठीही कर्ज 
ते म्हणाले, ""स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश व्हावा, म्हणून आम्ही विशेष प्रयत्न केले. केंद्राने सुरवातीला वगळून आता पुन्हा या योजनेत शहराला घेतले आहे. योजनेतील समावेशामुळे शहराला पाच वर्षांत 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यानंतर उर्वरित कामे कर्ज काढून करावी लागणार आहेत. "स्मार्ट सिटी'साठी एसपीव्ही कंपनी स्थापन करावी लागणार आहे. त्याची मुख्य सूत्रे अधिकाऱ्यांच्या हातात जाणार आहेत. त्यामुळे विकासकामांना अपेक्षित चालना मिळेल. या कंपनीत महापालिका पदाधिकाऱ्यांचाही समावेश करावा.'' 

नकली नोटा छापणाऱ्यांना फाशी द्या 
""केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांना 50 दिवसांनंतरही त्रास सोसावा लागत आहे. दोन हजार रुपयांची नोट छापून सरकारने उद्योजक आणि काळा पैसा दडवणाऱ्यांची सोय केली आहे का, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर नकली नोटा छापणारी टोळी सापडल्यास त्यांना फाशीची शिक्षा द्या, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

बारामतीकराने कोणाचे घोडे मारले? 
"बारामतीकराला परत पाठवा', असा मेसेज व्हॉट्‌सऍपवर फिरत असल्याचा उल्लेख करून पवार म्हणाले, ""बारामतीकराने कोणाचे घोडे मारले आहे? आम्ही सर्व समाजाला मानसन्मान, पदे देण्याचा प्रयत्न केला.'' 

प्रकल्पांची देखभाल गरजेची - बारणे 
""कोट्यवधी रुपये खर्च करून उभे करण्यात येणाऱ्या प्रकल्पांची आवश्‍यक देखभाल गरजेची आहे,'' असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. चिंचवडगावातील जिजाऊ पर्यटन केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ""पूररेषेत हा प्रकल्प येत असल्याने शासकीय लालफितीच्या कारभारात अडकला होता. मात्र, तो मार्गी लागला. या प्रकल्पामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडेल.''

Web Title: Committed to the development of the city for the NCP