#PunePolice पोलिसांसाठी "कॉमन मॅन' क्षुल्लकच ! 

#PunePolice पोलिसांसाठी "कॉमन मॅन' क्षुल्लकच ! 

पुणे - ताडीवाला झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेस थंडीताप आल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र अगोदर 50 हजार भरा, त्याशिवाय उपचार नाही, अशी भूमिका त्या रुग्णालयाच्या डॉक्‍टर आणि प्रशासनाने घेतली. बराच वेळाने 15 हजार रुपये भरण्याच्या तडजोडीनंतर उपचार सुरू झाले, पण थोड्याच वेळात रुग्ण दगावल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. वेळेत उपचार न केल्यामुळे आईचा मृत्यु झाला, हे पाहिल्यानंतर रुग्णाचा मुलगा सागर बनसोडे याने न्यायासाठी पोलिसांकडे धाव घेतली. पण "कमिशनर मॅडमच्या पतीचा जिथे मृत्यु होतो, तिथे तुझ्या आईच्या मृत्युचे काय ? प्रकरण मिटव, बॉडी घेऊन जा' अशा शब्दात कोरेगाव पार्क पोलिसांनी त्याची बोळवण केली. दोन महिने उलटले, अजूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. ""रुग्णालयाची तोडफोड केली असती, तर पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले असते. सनदशीर मार्गाने जाणे हा गुन्हा आहे का ? '' सागरचा हा प्रश्‍न ऐकूनच पुणे पोलिसांची असंवेदनशीलता व कार्यपद्धतीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण करतो. 

सागर बनसोडे याचे उदाहरण हे प्रातिनिधीक स्वरूपाचे आहे. "कॉमन मॅन' म्हणून तुम्ही कोणत्याही पोलिस ठाण्यात जा. तक्रारदार किंवा त्याच्यासमवेत आलेली व्यक्ती ही एखादी सराईत गुन्हेगार आहे, याच स्वरूपाची वागणूक कोणत्याही पोलिस ठाण्यात गेल्यानंतर सर्वसामान्यांना मिळते. त्यातच तुम्ही एखाद्या झोपडपट्टीत राहणारे असाल, तर पोलिसांच्यादृष्टीने तुम्ही आणि तुमचे जगणे हे किड्यामुंगीसमानच समजा ! सर्वसामान्य नागरिक त्याच्याबाबत घडणाऱ्या कुठल्याही अनुचित घटनेनंतर न्यायासाठी थेट पोलिसांचा आधार शोधण्याचा प्रयत्न करतो. पोलिसांकडून तक्रार ऐकून त्यावर पुढे तत्काळ कारवाई होईल, अशी सामान्य व्यक्तीला अपेक्षा असते. परंतु पोलिसांकडून काही "खास' कारणांसाठी मात्र धनदांडगे, राजकीय व्यक्ती, मोठे गुंड यांचीच "री' ओढली जाते. त्यानंतर "कॉमन मॅन' कायम संबंधित पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवित राहत असतो, हेच शहरातील वास्तव आहे. 

...म्हणून जनता दरबारास गर्दी 
पोलिस ठाण्यांमध्ये किरकोळ स्वरूपाची तक्रार दाखल करण्यास पोलिस टाळाटाळ करतात. मोठ्या प्रकरणांकडे पोलिस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. परिणामी सामान्य तक्रारदार न्यायासाठी थेट पोलिस आयुक्तांच्या जनता दरबारमध्ये धाव घेतो. किरकोळ तक्रारींपासून ते मोठमोठ्या प्रकरणांमध्ये पोलिस चौकी, पोलिस ठाण्यांच्या पातळीवर गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची तक्रारदारांची कैफियत असते. परिणामी, तक्रारदारांना जनता दरबाराद्वारे पोलिस आयुक्तांसमोर आपले गाऱ्हाणे मांडावे लागते. त्यामुळे जनता दरबारामध्ये तक्रारदार मोठ्या संख्येने येतात. 

कोणाकडे जायचेय त्यांच्याकडे जा ! 
पोलिस चौकीतील अधिकारी-कर्मचारी दखल घेत नाहीत म्हणून तक्रारदार पोलिस ठाणे गाठतात. तेथेही सहकार्य न मिळाल्यास तक्रारदार नाईलाजास्तव पोलिस आयुक्तांचा जनता दरबार, राजकीय व्यक्ती, प्रसारमाध्यमांची मदत घेतात. मागील महिन्यात एक तक्रारदार प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीमार्फत येरवडा पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांकडे गेले. त्या वेळी प्रसारमाध्यमांमार्फत आल्यामुळे संतप्त झालेल्या अधिकाऱ्याने तक्रारदार व त्याच्या साथीदारास सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली. त्याचबरोबर "कोणाकडे जायचेय त्यांच्याकडे जा' असेही सुनावले. 

"" पोलिस ठाण्यांच्या पातळीवर सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.''
डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com