साधता संवाद, मिटतो वाद : न्यायाधीश समीर कुरणे

प्रफुल्ल भंडारी
शनिवार, 14 जुलै 2018

दौंड (पुणे) : संवाद साधल्यास वाद मिटणे शक्य आहे. वर्षानुवर्ष वादात अडकण्यापेक्षा एकमेकांशी संवाद साधत महा लोक न्यायालयात समोर येत तोडगा काढल्यास नातेसंबंध चांगले राहतील, असे मत दौंड येथील प्रथमवर्ग न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश समीर कुरणे यांनी व्यक्त केले आहे. 

दौंड (पुणे) : संवाद साधल्यास वाद मिटणे शक्य आहे. वर्षानुवर्ष वादात अडकण्यापेक्षा एकमेकांशी संवाद साधत महा लोक न्यायालयात समोर येत तोडगा काढल्यास नातेसंबंध चांगले राहतील, असे मत दौंड येथील प्रथमवर्ग न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश समीर कुरणे यांनी व्यक्त केले आहे. 

दौंड न्यायालयात आज (ता. 14) आयोजित महा लोक न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून समीर कुरणे बोलत होते. सहन्यायाधीश पी. जी. लंबे, ए. टी. मनगिरे यांच्यासह गट विकास अधिकारी गणेश मोरे, दौंड वकील संघटनेचे अध्यक्ष मदन जगदाळे, उपाध्यक्ष राजकुमार कांबळे, अॅड. कावेरी गुरसळ, न्यायालयाचे सहायक अधीक्षक विनायक भालेराव, आदी या वेळी उपस्थित होते. विधी सेवा समिती व दौंड वकील संघाने संयोजन केले होते.           

समीर कुरणे म्हणाले, ``महा लोक न्यायालयाच्या माध्यमातून दाखलपूर्व आणि प्रलंबित दावे व खटले सामोपचाराने मिटू शकतात. जमीन वाटपाचा प्रश्न, बांधाचे वाद, कौटुंबिक तक्रारी, वैवाहिक वाद, फौजदारी खटले हे संवादाच्या अभावाने निर्माण होतात. स्वतः चा अहंकार, मत्सर आणि क्षुल्लक कारणांमुळे न्यायालयाची पायरी चढावी लागते. वर्षानुवर्ष चालणारे दावे आणि खटल्यांमुळे आर्थिक, शारीरिक व सामाजिक नुकसान होत आहे. महा लोक न्यायालयाच्या माध्यमातून वाद सामोपचाराने मिटल्यास नातेसंबंध आणि मैत्रीसंबंध पुन्हा प्रस्थापित होऊ शकतात. वाद नसल्याने समाजात शांती व सलोखा टिकून राहतो.``

माधुरी धुमाळ, के.व्ही.लोंढे, एन. एम. साखरे, व्ही. एस. कुलकर्णी या वकिलांनी पॅनलचे सदस्य म्हणून काम पहिले. संदीप येडे यांनी आभारप्रदर्शन केले.

महा लोक न्यायालयात एकूण ३०७५ दावे व प्रकरणे...        
महालोक न्यायालयात १३४ दिवाणी व ३६२ फौजदारी स्वरूपाची प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर महावितरणची थकित देयके - ११००, दौंड नगरपालिका थकित कर - ३१०, ग्रामपंचायतीचे विविध थकित कर व दौंड पंचायत समितीकडून अपूर्ण घरकुलांसंबंधी प्रकरणे - ७४५ , सहकारी पतसंस्था थकित रकमांची वसुली - १०५, सहकारी बॅंकांची वसुली - ९३, आदींसह एकूण २५७९ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.  

Web Title: communication help to reduce fight said sameer kurane