एकाकीपणावर संवाद हाच रामबाण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

पुणे - एकटे-दुकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी समाजाबरोबर संवाद साधण्यावर भर देण्याची गरज आहे, तर ज्येष्ठ नागरिक संघ, सोसायट्यांचे पदाधिकारी, विद्यार्थी, पोलिस यांनीही अशा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांशी संवाद वाढवून त्यांचा एकाकीपणा दूर करण्यासाठी प्रयत्न करावा. याविषयी अधिकाधिक जनजागृती झाली, तरच एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांचे प्रश्‍न सुटण्यास मदत होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी व्यक्त केली आहे. 

पुणे - एकटे-दुकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी समाजाबरोबर संवाद साधण्यावर भर देण्याची गरज आहे, तर ज्येष्ठ नागरिक संघ, सोसायट्यांचे पदाधिकारी, विद्यार्थी, पोलिस यांनीही अशा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांशी संवाद वाढवून त्यांचा एकाकीपणा दूर करण्यासाठी प्रयत्न करावा. याविषयी अधिकाधिक जनजागृती झाली, तरच एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांचे प्रश्‍न सुटण्यास मदत होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी व्यक्त केली आहे. 

विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका सोसायटीमधील एकट्या राहणाऱ्या अरुणा धुरू या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूच्या तीन ते चार दिवसांनंतर दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारच्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर शहरात एकटे-दुकटे राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांच्या काळजीपोटी अनेक प्रश्‍न उपस्थित होऊ लागले. त्यावर ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या काही संघटनांकडून ज्येष्ठांचा एकाकीपणा दूर घालविण्यासाठी काही उपाययोजना सुचविण्यात आल्या. 

एकाकी ज्येष्ठांसाठी सुचविलेल्या उपाययोजना  
बॅंकांनी वृद्धांची मालमत्ता सांभाळतानाच त्यांचा खर्च भागवावा. 
"लॉंग टर्म केअर युनिट'मध्ये जाण्याचा प्रयत्न करावा. 
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी वृद्धांकडे लक्ष द्यावे. 
पोलिसांनी वृद्धांकडे सातत्याने फेऱ्या माराव्यात. 
वृद्धांनीही पोलिसांवर विश्‍वास ठेवून सहकार्य करावे. 
मित्र, नातेवाइकांचे संपर्क क्रमांक शेजाऱ्यांकडे द्यावेत. 
वृद्धांनी सर्वांशी सातत्याने संवाद ठेवावा. 
ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात. 
समाजाच्या विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याचा प्रयत्न करावा. 

एकाकी ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्‍न दिवसेंदिवस वाढत आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे हा प्रश्‍न निर्माण होत आहे. 70 वर्षांच्या पुढील व जोडीदार नसलेल्या ज्येष्ठांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. ज्येष्ठांनीही योग्य व्यक्तींवर विश्‍वास ठेवून स्वतःचे आयुष्य सुखकर करावे. 
डॉ. विनोद शहा, अध्यक्ष जनसेवा फाउंडेशन 

वृद्ध नागरिकांनी आपल्या सोसायटीतील शेजाऱ्यांशी किंवा विद्यार्थ्यांशी अधिकाधिक संवाद साधावा. सोसायट्यांनीही बैठका घेऊन एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांकडे लक्ष देण्यासाठी प्रयत्न करावा. पोलिसांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे. त्यामुळे ज्येष्ठांना आधार मिळू शकेल. 
शेखर सोमण, ज्येष्ठ नागरिक. 

औषधे, दवाखाना, पेपर वाचणे अशा प्रकारची सेवेची एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अधिक गरज असते. मात्र, त्यांचा इतरांवर विश्‍वासही नसतो. त्यामुळे त्यांचे प्रश्‍न सुटण्यापेक्षा ते अधिक गुंतागुंतीचे होत जातात. म्हणूनच वृद्ध नागरिकांनी सर्वांशी संवाद वाढवावा. विविध कार्यक्रमांमध्ये आवर्जून सहभागी व्हावे. 
दिलीप पवार, कार्याध्यक्ष, पुणे ज्येष्ठ नागरिक मध्यवर्ती संघटना (ऍस्कॉप) 

Web Title: Communication on loneliness

टॅग्स