उच्चशिक्षणात ‘कम्युनिटी एंगेजमेंट’

उच्चशिक्षणात ‘कम्युनिटी एंगेजमेंट’

पुणे - महाविद्यालये आणि विद्यापीठांना समाजाशी जोडून ज्ञानाचा उपयोग सामाजिक समस्या सोडविण्यासाठी करता यावा, म्हणून उच्चशिक्षणात ‘कम्युनिटी एंगेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसीने) शिक्षण संस्था आणि समाज यांना एकत्र आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

विद्यार्थी उच्चशिक्षण घेत असतो; परंतु त्याने मिळविलेले ज्ञान समाजाला उपयोगी पडतेच असे नाही. त्यामुळे विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच समाजाशी जोडला जावा, समस्यांवर उपाय शोधण्याचे काम त्याला समाजाबरोबर राहून करता यावे किंवा त्याच्या ज्ञानाचा समाजाला फायदा व्हावा, या उद्देशाने ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अँड कम्युनिटी एंगेजमेंट’ ही संकल्पना अभ्यासाच्या रूपाने उच्च शिक्षणात रुजविण्याचा निर्णय ‘यूजीसी’ने घेतला आहे.

 वर्गातील शिक्षण आणि प्रत्यक्ष काम यातील तफावत यातून दूर होणार आहे. याबरोबरच सामान्य जीवनातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या समजण्याबरोबर त्यावर उपाय शोधण्याचे काम विद्यार्थ्यांकडून होऊ शकेल. विद्यार्थी आणि शिक्षकही समाजाबरोबर जोडला जाऊन सामाजिक विकासात त्यांचे योगदान मिळू शकणार असल्याचे आयोगाचे मत आहे. आयोगाच्या या संकल्पनेमुळे समाजशास्त्र शाखा ही केवळ काही विद्याशाखांपुरती मर्यादित राहणार नाही, तर उच्चशिक्षणातील सर्व विद्याशाखांद्वारे हे ‘कम्युनिट एंगेजमेंट’चे उपक्रम राबवावे लागणार आहेत. यामुळे संशोधक विद्यार्थी अनेक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी समाजाची मदत करू शकतील. तसेच, संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेऊ शकतील.  

समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालये सध्याच्या अभ्यासक्रमात त्याचा अंतर्भाव करू शकतील, वा नवे संबंधित अभ्यासक्रम त्यांना तयार करता येतील. या उपक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ‘क्रेडिट’च्या रूपात लाभही मिळेल. म्हणजेच त्यांच्या शैक्षणिक मूल्यमापनात त्याची दखल घेतली जाणार आहे. हे उपक्रम राबविताना समाजातील विविध विषयांतील तज्ज्ञ वा कार्यकर्ते यांची मदतदेखील घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांना समाजातील वास्तव, शेतकऱ्यांच्या अडचणी समजाव्यात, समाजाप्रती त्यांची संवेदना वाढून प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांना योगदान देता यावे म्हणून उच्चशिक्षणातही ‘कम्युनिटी एंगेजमेंट’ ही संकल्पना रुजविण्यात येणार आहे.
- डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग

सूचना व हरकतींसाठी आराखडा खुला
आयोगाने नव्या संकल्पनेचा आराखडा सूचना आणि हरकतींसाठी खुला केला आहे. यात अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांनी राबवायचे उपक्रम आणि प्रात्यक्षिकांचे विषय दिलेले आहेत. स्थानिक प्रशासन वा ग्रामपंचायतीचा कारभार समजून घेणे, स्थानिक गरजांनुसार उद्योजकता विकास, त्यासाठी वित्तपुरवठ्याबाबत माहिती, स्वच्छता, आरोग्यविषयक जागृती, जलसंधारण, महिला सबलीकरण, ग्रामीण कलाकुसरीसाठी बाजारपेठ आदींसारखे अभ्यासाचे विषय त्यात दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com