लग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही

Marriage
Marriage

पुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल... कर्जबाजारी झाल्यामुळे गरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या आत्महत्या... हे सर्व दुष्टचक्र थांबविण्यासाठी धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी मोफत लग्नसोहळ्यांचे आयोजन केले आहे. 

राज्याचे धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी धर्मादाय संस्थांना सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्याला पुण्यासह राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्ह्यात लोणावळ्यात सामुदायिक सोहळ्यात १८ जोडप्यांचा आणि भीमाशंकर येथे ११ जोडप्यांचा विवाह नुकताच पार पडला. 

पुणे जिल्हा धर्मादाय सामुदायिक विवाह समिती आणि संस्थांच्या वतीने एप्रिल आणि मे महिन्यात विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात गरीब, श्रीमंत आणि कोणत्याही जाती-धर्माच्या वधूवरांना सहभागी होता येईल. लग्नासाठी एकही रुपयाचा खर्च येणार नाही. काही संस्थांकडून सोहळ्यात वधूवरांना पूर्ण पोशाख, शालू, मणीमंगळसूत्र अशा सुविधा देण्यात येणार आहेत. या सोहळ्यात गरीब, श्रीमंत तसेच शेतकरी, कष्टकऱ्यांनी मुला-मुलींचे लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात करावीत, असे आवाहन पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्‍त शिवाजीराव कचरे आणि धर्मादाय उपायुक्‍त नवनाथ जगताप यांनी केले आहे. 

संस्थापिका होणार विवाहबद्ध
दौंड येथील आई सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका शुभांगी धायगुडे यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात त्या स्वतः आणि अन्य २१ जोडपी विवाहबद्ध होत आहेत. शुभांगी यांचे वडील नवनाथ धायगुडे हे सहायक फौजदार आहेत. धर्मादाय आयुक्‍त डिगे यांच्या विचारांच्या प्रेरणेतून सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला, असे नियोजित वधू शुभांगी यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सामुदायिक विवाह सोहळा, आयोजक संस्था आणि तारीख
 आई सेवाभावी संस्था, दौंड : २७ एप्रिल २०१८
 श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान, निमगाव सावा, 
ता. मावळ : २८ एप्रिल २०१८
 ग्राम विकास मंडळ, खोडद : २९ एप्रिल २०१८ 
 म्हसोबा देवस्थान, खारवडे, मुळशी : २९ एप्रिल २०१८
 श्री भैरवनाथ आदिवासी मंडळ : ६ मे २०१८
 आदर्श क्रांती संघ, सासवड : ७ मे २०१८
 रांजणगाव गणपती : ९ मे २०१८
 मार्तंड देव संस्थान, जेजुरी : १० मे २०१८
 विघ्नहर देवस्थान, ओझर : ११ मे २०१८

सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करणे हे कमीपणाचे नसून, प्रतिष्ठेची बाब आहे. सामाजिक बांधिलकी आणि सलोखा जोपासण्यासोबतच अनावश्‍यक खर्च होऊ नये, हा यामागील उद्देश आहे. धार्मिक संस्थांकडे पडून असलेला निधी हा सार्वजनिक पैसा आहे. त्यापैकी काही निधीचा वापर हा शेतकरी आणि गरीब घटकांसाठी झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
- शिवकुमार डिगे, धर्मादाय आयुक्‍त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com