पुणे : महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांना मारहाण प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पुणे : जलपर्णी काढण्यासाठी काढलेल्या बेकायदा निविदा प्रकरणावरुन कारणावरुन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर, नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह 17 कार्यकर्तेवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे : जलपर्णी काढण्यासाठी काढलेल्या बेकायदा निविदा प्रकरणावरुन कारणावरुन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर, नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह 17 कार्यकर्तेवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे.

तलावांत जलपर्णी नसतानाही ती काढण्यासाठी राबविलेली 23 कोटींची निविदा आठपट असल्याची कबुली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सोमवारी महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोर दिली. त्याचक्षणी या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची घोषणा महापौरांनी केली; तसेच या निविदेची सविस्तर माहिती चोवीस तासांत सादर करण्याचा आदेशही त्यांनी प्रशासनाला दिला. यामुळे या प्रकरणातील काळेबेरे समोर येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 
दरम्यान, बनावट निविदाप्रकरणी आंदोलन करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसचे नगरसेवक आणि निंबाळकर यांच्यात बाचाबाची झाली. त्या वेळी निंबाळकर यांना किरकोळ मारहाणही झाली. त्यामुळे महापालिकेत गोंधळ उडाला. या घटनेनंतर महापालिकेच्या आवारात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी काम बंद आंदोलन करणार असल्याचे महापालिक कर्मचारी संघटनेने सांगितले. 

पाषाण; तसेच कात्रजमधील दोन तलावांतील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने 23 कोटींची निविदा काढली. मात्र या तलावांत जलपर्णीच नसल्याचे "सकाळ'ने उघडकीस आणल्याने ही निविदा रद्द झाली. 

निविदा रद्द झाली तरी, ती काढण्याचा उद्देश काय, अशी विचारणा करीत, विरोधकांनी महापौरांच्या दालनात सायंकाळी आंदोलन केले. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने याबाबत खुलाशासाठी महापौरांनी निंबाळकर यांना आपल्या दालनात बोलावले तेव्हा, ""जलपर्णी काढण्यासाठी वर्षाला एक कोटी रुपये खर्च येतो. मात्र, ही निविदा आठ ते नऊपट आहे. त्यावर कार्यवाही होणार नाही,' असा खुलासा निंबाळकर यांनी केला. मात्र, हे प्रकरण उघडकीस आले नसते तर पुणेकरांचे कोट्यवधी रुपये वाया गेले असते. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी विरोधकांनी केली. निंबाळकरांचा खुलासा ऐकून महापौरांनी 24 तासांत निविदेची माहिती देण्याचा आदेश देत निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची घोषणा केली. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, चेतन तुपे, अविनाश बागवे यांच्यासह दोन्ही कॉंग्रेसचे नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले होते. 

नेमके काय घडले... 
या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश महापौरांनी दिल्यानंतरही महागडी निविदा का काढली, असा प्रश्‍न आंदोलनकर्त्यांनी विचारला. ""प्रशासनातील अधिकारी चोर आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी केली. धंगेकर यांनी प्रशासनाला चोर म्हटल्याने निंबाळकर संतप्त झाले आणि ""चोर म्हणता? तुमची लायकी काय, अशी विचारणा निंबाळकरांनी ठिय्या मांडलेल्या नगरसेवकांकडे पाहात केली. त्याचवेळी धंगेकर यांनी निंबाळकर यांच्या दिशेने चप्पल फेकली. त्यामुळे महापौरांच्या दालनात गोंधळ उडाला. या गोंधळात एका कार्यकर्त्याने निंबाळकर यांना किरकोळ मारहाण केली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी निंबाळकरांना बाहेर नेल्याने वाद टळला. 

महापालिकेत पहिल्यांदाच अशाप्रकारे अतिरिक्त आयुक्तांना मारहाण
ही घटना समजताच महापालिका आयुक्त सौरभ राव महापालिकेत आले. तोपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकारीही महापालिकेत आले. राव यांनी महापौरांची भेट घेतली. त्यानंतर हा वाद पोलिसांपर्यंत जाऊ नये, यासाठी सत्ताधारी, विरोधी पक्षांचे पदाधिकारी आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महापौरांच्या दालनात बैठक झाली. या वादावर सव्वातास चर्चा होऊनही तोडगा निघला नाही. प्रशासन आणि विरोधक आपापल्या भूमिकांवर ठाम राहिले. मात्र, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. महापालिकेत पहिल्यांदाच अशाप्रकारे अतिरिक्त आयुक्तांना मारहाण झाली. 

राजेंद्र निंबाळकर यांनी सोमवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन धंगेकर, शिंदे यांच्यासह 17 जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाहन विभागाबाबत प्रश्‍नचिन्ह 
जलपर्णी काढण्याची जबाबदारी आरोग्य खात्याची आहे. मात्र निविदा काढली ती वाहन विभागाने. ही निविदा या खात्याने का काढली, या खात्याचा संबंध काय, या प्रश्‍नाचे उत्तर या खात्याच्या प्रमुखांकडे नाही. महापालिकेच्या वाहनांची देखरेख ही या खात्याची जबाबदारी आहे. जलपर्णीच्या कामांवर कोणाचे लक्ष नसते आणि ही कामे दिसून येत नाहीत, अशा भ्रमात राहूनच या खात्याचे प्रमुख किशोर पोळ यांनी ही निविदा काढली. 

''माझ्या दालनात घडलेली घटना दुर्दैवी आहे. मात्र, महापालिकेत कोणाचीही गुंडगिरी खपवून घेणार नाही. यासंदर्भात आयुक्तांनी निर्णय घ्यावा, अशी सूचना केली आहे. हा विषय संवेदशील असून, त्याची जाहीर चर्चा करणे योग्य नाही.'' 
- मुक्ता टिळक, महापौर 

''जलपर्णी प्रकरणाच्या चौकशीची मागणी होती. मात्र निंबाळकर यांनी अवमान केल्याने धक्काबुक्की झाली. त्यातील कार्यकर्ता आमचा नाही, आमची गुंडगिरी नाही.''
अरविंद शिंदे, गटनेता, कॉंग्रेस 

Web Title: Complaint file against 17 in case of attack on Additional Commissioner