मोबाईल ऍपवर करा खड्ड्यांची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

पिंपरी - पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी महापालिकेने खास मोबाईल ऍप तयार केले आहे. यावरून केलेल्या तक्रारींचे निवारण स्थापत्य विभागाकडून त्वरित केले जाणार आहे.

पिंपरी - पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी महापालिकेने खास मोबाईल ऍप तयार केले आहे. यावरून केलेल्या तक्रारींचे निवारण स्थापत्य विभागाकडून त्वरित केले जाणार आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे अनेक जण जखमी; तर अनेकांना जीवही गमवावा लागतो. या पार्श्‍वभूमीवर वेगळी यंत्रणा उभारण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार गेल्या वर्षी महापालिकेने पॉटहोल ही खड्ड्यांबाबत माहिती त्वरित मिळाविण्यासाठी यंत्रणा उभारली होती. आता मोबाईलद्वारे ही तक्रार करता येईल. त्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन विकसित करण्याचे काम सुरू आहे. खड्ड्यांची माहिती तत्काळ कळविणे शक्‍य व्हावे व तातडीने दुरुस्ती व्हावी याकरिता Mobile App Pothole Mobile based Management System सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा Android based Mobile द्वारे उपलब्ध केली आहे.

सदरचे Mobile App Google Play Store वरून डाउनलोड करता येणार आहे. ही सुविधा M-PCMC या नावाने उपलब्ध आहे. या App चा वापर करण्यासाठी नागरिकांना प्रथमतः नाव, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी इत्यादी माहिती भरून फक्‍त एकदाच नोंदणी करणे आवश्‍यक आहे. या सुविधेद्वारे नागरिकांना खड्ड्यांचा फोटो अपलोड करता येईल. या आधारे तत्काळ महापालिकेस Geo location सह माहिती उपलब्ध होईल. खड्ड्यांबाबतच्या तक्रारींवर स्थापत्य विभागास तातडीने कार्यवाही करता येणार आहे. ऍपद्वारे केलेल्या तक्रारीचे निराकरण झाले आहे किंवा नाही, याची खात्रीही नागरिकांना करता येईल. त्याबाबतचे एसएमएस या ऍपद्वारे उपलब्ध होणार आहेत. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्‍त दिनेश वाघमारे यांनी केले.
दरम्यान मिळकतकर, पाणीपट्टी, जन्म-मृत्यू दाखला, तक्रारनिवारण, नागरी सुविधा केंद्र , सारथी हेल्पलाइन, क्रीडा, खेळ आरक्षण, भाग नकाशा, झोन दाखला, विवाह नोंदणी आरक्षण, स्थानिक संस्थाकर, ऑनलाइन बांधकाम परवानगी व माहिती अधिकार इत्यादी ऑनलाइन महापालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत.

Web Title: Complaint mobile pot holes