पुणे : 73 कोटींच्या बँक गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

- शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत झाला 73 कोटींचा गैरव्यवहार. 

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील कथित 73 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित अर्जाची चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल, असे डेक्कन पोलिसांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील कथित 73 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी पोलिसात तक्रार द्यावी, असे निर्देश सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी बॅंकेच्या वैधानिक लेखापरीक्षकास दिले होते. या बॅंकेचे वैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी टोरवी पेठे अँड कंपनीच्या लेखा परीक्षकाची नियुक्ती केली होती. रिझर्व्ह बॅंकेने या बॅंकेची रोख शिल्लक रकमेची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी बॅंकेच्या रोख शिल्लक तपासणीमध्ये सुमारे 73 कोटी रुपये कमी आढळून आले होते. या रोख रकमेचा गैरवापर केल्यामुळे आर्थिक अपहार झाल्याचे लेखापरीक्षणात नमूद करण्यात आले होते. यासंदर्भात सहकार आयुक्तांनी अपहारास जबाबदार असणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार द्यावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार, लेखापरीक्षकांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

यासंदर्भात डेक्कन पोलिसांना विचारले असता, त्यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यास अर्ज प्राप्त झाला आहे. या अर्जाची पडताळणी करुन पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. तर "लेखापरीक्षकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आमच्या विभागाकडे हे प्रकरण आल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल.'' असे आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint registered for Bank Scam of Rs 73 Crores