रिंगरोडच्या दुसऱ्या  टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण

रिंगरोडच्या दुसऱ्या  टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण

पुणे - पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या दुसऱ्या टप्प्यातील सुमारे ६४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. नव्याने आखणी करण्यात आलेल्या या रिंगरोडचा समावेश मंजूर प्रादेशिक योजनेत करण्यासाठीचा प्रस्ताव एमएसआरडीसीकडून लवकरच राज्य सरकारकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. 

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि एमएसआरडीसीकडून रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन्ही रिंगरोड जिल्ह्यातील काही गावांमधून समांतर जात असल्यामुळे रिंगरोडची पुनर्आखणी करावी, अशी सूचना राज्य सरकारने एमएसआरडीसीला केली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने दोन टप्प्यांत या रिंगरोडची नव्याने आखणी केली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात नगर, सोलापूर आणि सातारा रस्ता  या महामार्गांना जोडणाऱ्या रिंगरोडचा समावेश होता. हा रिंगरोड पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळापर्यंत न्यावा, अशीही सूचना सरकारने केली. त्यानुसार या रस्त्याची पुनर्आखणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

याविषयी एमएसआरडीसीचे उपविभागीय अभियंता संदीप पाटील म्हणाले, की दुसऱ्या टप्प्यातील खेड शिवापूर ते मुंबई द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या सुमारे ६४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. नव्याने आखणी करण्यात आलेल्या हा रिंगरोडचा समावेश मंजूर प्रादेशिक योजनेत करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगर रचना विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्याबरोबरच या रस्त्याच्या दुतर्फा नगर रचना योजना राबविण्याचा प्रस्तावही पाठविण्यात येईल.

असा असेल दुसरा टप्पा 
दुसऱ्या टप्प्यातील रिंगरोड हा खेडशिवापूर- कल्याण- मालखेड- मुठा- पौड- मुंबई द्रुतगती मार्ग असा असणार आहे. त्याची लांबी सुमारे ६४ किलोमीटर आणि रुंदी ११० मीटर असणार आहे. चार तालुक्‍यांतील ३१ गावांमधून हा रस्ता जाणार आहे. या रस्त्यावर तीन मोठे पूल आणि एक भुयारी मार्ग असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com