उद्योगनगरीत संपाला संमिश्र प्रतिसाद

खराळवाडी, पिंपरी : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी कायद्यांविरोधात संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत सहभागी झालेले संघटीत, असंघटीत कामगार.
खराळवाडी, पिंपरी : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी कायद्यांविरोधात संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत सहभागी झालेले संघटीत, असंघटीत कामगार.

पिंपरी - केंद्र सरकारच्या कामगारविरोधी कायद्यांच्या विरोधात विविध बारा कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला बुधवारी शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला. मात्र, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांमधील यंत्रांचा खडखडाट थांबला होता.

या संपात काही सरकारी बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. संपात सहभागी न झालेल्या बॅंकांचे कामकाज सुरळीत सुरू होते. टपाल कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे अनेकांना ती सेवा मिळाली नाही. या कर्मचाऱ्यांची संख्या आधीच कमी आहे. त्यात संपामुळे शिल्लक टपाल वाटपास आणखी उशीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बससेवा सुरळीत सुरू होती. त्यामुळे प्रवाशांचे फारसे हाल झाले नाहीत. रेल्वेसेवाही सुरळीत होती. या संदर्भात रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले, ‘‘आम्ही अगोदरच संपात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे रेल्वेचे काम सुरळीत सुरू होते.’’

कामगार संघटना संयुक्‍त कृती समितीचे जिल्हाध्यक्ष कैलास कदम म्हणाले, ‘‘केंद्राने कामगार कायद्यात बदल करताना संघटनांशी विचारविनिमय करावा. देशाला महाशक्ती करण्यासाठी कामगार हिताचे कायदे हवेत. विकासासाठी थेट परकीय गुंतवणूक यायला हवी.’’ या संदर्भात बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष जयंत शिंदे म्हणाले, ‘‘केंद्र सरकारच्या सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाच्या धोरणास विरोध आहे. समान काम, समान वेतन मिळायला हवे.’’ एसटी कर्मचारी संपात सहभागी नसल्याने वल्लभनगर येथील एसटी आगारातील बससेवा सुरळीत सुरू होती. रिक्षा 
व्यावसायिक संपात सहभागी नसल्याने शहरातील रिक्षा सुरळीत सुरू होत्या. 

देहूरोडमध्येही प्रतिसाद 
देहूरोड येथील लष्कराच्या विविध डेपोतील कामगार संघटनांनी प्रवेशद्वारासमोर सकाळी कामगारांनी केंद्र सरकारचा निषेध केला. झेंडेमळा येथील केंद्रीय आयुध भांडार डेपोत सीओडी वर्कस युनियन, इंटक, बहुजन कामगार संघ, भारतीय मजदूर संघ या संघटना सहभागी झालेल्या होत्या. चंदन आल्हाट, बाळासाहेब चव्हाण, शब्बीर इनामदार, संजय दुमडे आदी सहभागी झाले होते. गॅरीसन इंजिनिअरिंगमधील एमईएस एम्प्लॉईज युनियनचे कामगार संपात सहभागी झाले. हनुमंत कातोरे, मच्छिंद्र ताटे  सहभागी झाले होते. ऑर्डनन्स फॅक्‍टरी, सीक्‍यूएसव्हीमधील कामगारही संपात सहभागी झाले होते.

दुचाकी रॅलीला मोठा प्रतिसाद
कंत्राटी कामगार कायद्यासह काही कायद्यांविरोधात आणि विविध मागण्यांसाठी बुधवारी संघटित, असंघटित कामगारांचा देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारला होता. त्यात राष्ट्रीय कामगार संघटनांसह इंटक, आयटक, एचएमएस, सीटू, एआययूटीसीयू, टीयूसीसी, एसईडब्ल्यूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूसी या संघटनांसह सर्व क्षेत्रांतील असंघटित कामगार संघटनाही सहभागी झाल्या होत्या. या रॅलीला कामगारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यात कामगार उत्साहाने सहभागी झाले होते. अनेक कामगारांनी त्यांच्या संघटनांचे झेंडे हातात घेतले होते. केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. शहराच्या विविध भागांतून आलेले कामगार डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमले. तेथून रॅलीला सुरुवात झाली. इरफान सय्यद, पांडुरंग गडेकर, माधव रोहम, अनिल रोहम तसेच परिसरातील औद्योगिक वसाहतीतील कामगार सहभागी झाले होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com