पुणे - वाकडमधील पलाश सोसायटीत ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत

रवींद्र जगधने
शनिवार, 12 मे 2018

पिंपरी (पुणे) : कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत असताना वाकडमधील पलाश सोसायटी मात्र, स्वतःचा कंपोस्टींग प्रकल्प उभारून महिन्याला सुमारे आठशे किलो कंपोस्ट खत तयार करत आहे. या खताचा वापर सोसायटीतील झाडांना किंवा त्याची विक्री करून सोसायटी खर्चास हात भार लावला जात आहे. 

पिंपरी (पुणे) : कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत असताना वाकडमधील पलाश सोसायटी मात्र, स्वतःचा कंपोस्टींग प्रकल्प उभारून महिन्याला सुमारे आठशे किलो कंपोस्ट खत तयार करत आहे. या खताचा वापर सोसायटीतील झाडांना किंवा त्याची विक्री करून सोसायटी खर्चास हात भार लावला जात आहे. 

295 सदनिकांमधून महिन्याला सुमारे साडेचार हजार किलो ओल्या कचऱ्यापासून आठशे किलो कंपोस्ट खत तयार केले जाते. या प्रकल्पाला तब्बल दहा लाख खर्च आला असून सोसायटीतील झाडांचा पालापाचोळाही प्रकल्पात वापरला जातो. कचऱ्याच्या गाडीत केवळ सुकाच कचरा टाकला जातो. अगोदर वैयक्तिक पातळीवर हा प्रयोग राबवण्यात आला. मात्र, मायक्रो बायलॉजीचा अभ्यास झालेल्या स्वाती कोर्डे यांनी रहिवास्यांपुढे कंपोस्ट खताचा प्रकल्प व्यापक स्वरूपात उभारण्याचा विचार मांडला. त्याला सर्व रहिवास्यांनी मान्यता दर्शवत ऑगस्ट 2017 मध्ये प्रकल्प सुरू झाला. याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या एक टन कंपोस्ट खत पडून असून शेतकऱ्यांना माफक दरात ते देण्याचा सोसायटीचा मानस आहे. 

सोसायटी दरवर्षी वृक्षारोपण करते. सोसायटीत बाराशे छोटी-मोठी झाडे असून कंपोस्ट खतामुळे त्यांची चांगली वाढ होते. पवन चक्की व सौर ऊर्जा प्रकल्पही आहे. 95 सदनिकांना वॉटर सोलर असून रेनवॉटर हार्वेटींगमध्ये गच्चीसह परिसरातील पाणी साठवले जाते. पाणी बचतीसाठी सर्व सदनिकांत नळाला नोझल बसविले आहे. 

आम्ही सामाजिक उपक्रम राबवत असतो. यंदा महापालिका स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला असून सोसायटीतील लहान मुलांना पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले जातात. तसेच कागदी रद्दीच्या बदल्यात एका एनजीओकडून कागदी पिशव्या घेतऊन त्याचा वापर रहिवास्यांनी सुरू केला आहे. 

-किरण वडगामा, अध्यक्ष, पलाश सोसायटी 

कंपोस्ट खताच्या उपक्रमाबरोबर सोसायटीने पक्षांसाठी झाडांवर घरटी बांधली असून मुलांमध्ये पक्षांबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच सोसायटी सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. 

-सुभाषचंद्र सुभेदार, सदस्य 

आपण निर्माण केलेल्या कचऱ्याची आपणच विल्हेवाट लावल्यास त्याचा इतरांना त्रास होणार नाही. शहरातील सर्व सोसायट्यांना असा प्रकल्प उभारल्यास महापालिकेवरील मोठा ताण कमी होईल. तसेच घरोघरी कमी खर्चात हा प्रयोग करता येतो. 

-स्वाती कोर्डे, सदस्य 

Web Title: compost fertilizer in palash society