उपोषणकर्त्या वयोवृद्ध शेतकऱ्यांची प्रकृती खालावली

राजकुमार थोरात
शुक्रवार, 23 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी निरवांगी (ता.इंदापूर) येथे सुरु असलेल्या कोरड्या नदीमधील उपोषकर्त्या वयोवृद्ध शेतकऱ्यांची प्रकृती खालवण्यास सुरवात झाली असुन उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची वजने कमी होण्यास सुरवात झाली आहे. प्रशासन पाणी सोडण्यास चालढकल करीत असल्याने शेतकऱ्यांनी उपोषण न सोडल्यास चिंतेचा विषय होण्याची शक्यता आहे.  

वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी निरवांगी (ता.इंदापूर) येथे सुरु असलेल्या कोरड्या नदीमधील उपोषकर्त्या वयोवृद्ध शेतकऱ्यांची प्रकृती खालवण्यास सुरवात झाली असुन उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची वजने कमी होण्यास सुरवात झाली आहे. प्रशासन पाणी सोडण्यास चालढकल करीत असल्याने शेतकऱ्यांनी उपोषण न सोडल्यास चिंतेचा विषय होण्याची शक्यता आहे.  

इंदापूर तालुक्यातील नीरा नदी काठच्या शेतकऱ्यांनी नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी गुरुवारी (ता.२२) बेमुदत उपोषणला सुरवात केली आहे. यामध्ये निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ, खोरोचीचे सरपंच संजय चव्हाण, धनंजय रणवरे यांच्यासह १६ शेतकरी उपोषणला बसले आहेत. यामध्ये श्रीरंग रासकर (वय ६५), चंद्रकांत फडतरे (वय ६०), शंकर होळ (वय ७२), अजिनाथ कांबळे (वय ७९) या वयोवृद्ध शेतकऱ्यांचा समावेश आहे.

सर्व उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणीच्या अहवालानूसार शरीरातील साखर, पाणी, क्षारांचे प्रमाण कमी होण्यास सुरवात झाली असून प्रकृती खालवण्यास सुरवात झाली आहे. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी बारामतीचे प्रांतधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना भेट देवून उपोषण स्थगित करण्याची विनंती केली.मात्र शेतकऱ्यांनी नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याशिवाय उपोषण पाठीमागे घेणार नसल्याचे सांगितले. मुंबईमध्ये जलसंपदामंत्री विजय शिवतारे,आमदार दत्तात्रेय भरणे यांच्याशी झालेल्या चर्चेचा माहिती अभिजित रणवरे,वीरसिंह रणसिंग व नंदकुमार रणवरे यांनी शेतकऱ्यांनी दिली.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, महारुद्र पाटील, दत्तात्रेय शेंडे यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना भेट  दिली. 

नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी प्रशासन  व शासन वेळकाढूपणा करीत असल्याचा निषेध नदीकाठची गावे करणार आहेत. उद्या शनिवार (ता.२४) रोजी निरवांगी गावामध्ये काळ्या गुढ्या उभारुन गाव बंद ठेवून शासनाचा निषेध करणार असल्याचे माजी सरपंच दशरथ पोळ यांनी सांगितले.

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील गुरुवार पासुन नदीपासुन शेतकऱ्यांसाठी तळ ठोेकून आहेत. पोलिस प्रशासन, आरोग्य विभागाचे  अधिकारी ही उपोषणाच्या ठिकाणी भेटी देत आहेत. मात्र नीरा नदीमध्ये पाणी सोडण्याचा प्रश्‍न पाटबंधारे विभागाचा असूनही आज दुपारपर्यंत पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपोषणस्थळी फिरकले नसल्याने प्रांतधिकारी हेमंत निकम व तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

Web Title: condition of hunger strikers are bad