मंचर येथे आज भाजप कार्यालयात गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

condolence meeting tribute to Girish Bapat BJP office in Manchar today politics

मंचर येथे आज भाजप कार्यालयात गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा

मंचर : भाजपचे जेष्ठ नेते खासदार (स्व) गिरीश बापट यांचे आंबेगाव तालुक्यासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी पालकमंत्री असताना मंचर शहर व परिसराच्या विकासासाठी तब्बल नऊ कोटी रुपयांचा निधी दिला होता.

कार्यकर्त्यांना सतत सन्मानपूर्वक वागणूक देत होते. अश्या अनेक आठवणी सांगताना भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. अनेक प्रसंग ऐकताना उपस्थितांनाही गहिवरून आले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे रविवारी (ता.२) भाजप कार्यालयात बापट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा झाली. सुरुवातीला बापट यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले संजय थोरात म्हणाले “कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मला आंबेगाव तालुका भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.

विकास काम करत असताना कोण कोणत्या पक्षाचा? ते बघू नकोस. जी कामे असतील ती सर्व घेऊन ये.असे ते आवर्जून सांगायचे. इजराइल देशाच्या दौर्यात बापट साहेबांचा दहा दिवस सहवास मला लाभला. त्यांची काम करण्याची पद्धत व आठवणी अविस्मरणीय आहे.

जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य भानुदास (नाना) काळे म्हणाले की “जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची कामे आणू शकलो. त्यांनी कधीच रिकाम्या हाताने मला पाठाविले नाही.”

यावेळी तालुकाध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे, सरचिटणीस संदीप बाणखेले, संतोष बाणखेले, स्नेहल चासकर, अर्चना बुट्टे,उर्मिला कांबळे, उत्तम राक्षे, बाळासाहेब कोकणे, गणेश काळे,कालिदास गांजाळे, उपस्थित होते.तालुकाध्यक्ष महिला मोर्चा रूपाली घोलप, जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीस नवनाथ थोरात, भागूजी बाणखेले आदींनी आठवणी सांगितल्या.

टॅग्स :Pune NewsGirish Bapat