गोपनीय डेटा चोरून 24 लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे - आयटी करिअर मार्गदर्शन करणाऱ्या खासगी संस्थेतील कर्मचाऱ्यांनी संबंधित संस्थेचाच गोपनीय डेटा चोरून तब्बल 24 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना 5 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पुणे - आयटी करिअर मार्गदर्शन करणाऱ्या खासगी संस्थेतील कर्मचाऱ्यांनी संबंधित संस्थेचाच गोपनीय डेटा चोरून तब्बल 24 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना 5 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

प्रीती गिरिधर पवार (मूळ रा. नंदुरबार, सध्या कोथरूड) व दादाभाऊ मच्छिंद्र सागर (मूळ रा. संगमनेर, सध्या कोथरूड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी उज्ज्वला रामकृष्ण चौधरी (वय 29, रा. कोथरूड) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांची नवी पेठ येथे यू. व्ही. टेक्‍नोक्रॅट्‌स ही आयटी करिअर मार्गदर्शन करणारी संस्था आहे. त्यांच्या संस्थेमध्ये प्रीती पवार ही कार्यालयीन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तिच्या सांगण्यावरून सागर यास संस्थेमध्ये ऍडमीन एक्‍झिक्‍यूटिव्ह म्हणून नोकरी देण्यात आली. संस्थेकडे आयटी करिअर मार्गदर्शनाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेत होते. दरम्यान काही दिवसांपासून दोघांनीही विद्यार्थ्यांमध्ये संस्थेबद्दल चुकीची माहिती पसरवीत त्यांना अन्य संस्थेमध्ये पाठविले. संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करत विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीचा महत्त्वाचा डेटा लॅपटॉप, हार्डडिस्कवरून चोरून तो अन्य कंपन्यांना दिला. चौधरी यांच्या स्वाक्षरीचा गैरवापरही केला. या सगळ्या प्रकारामुळे संस्थेला आर्थिक फटका बसला. याबरोबरच संस्थेची बदनामीही झाली. या सर्व प्रकाराबाबत विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमृत मराठे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: confidential data thef 24 lakh fraud