हत्तीविरोधातील संघर्ष घातक 

योगीराज प्रभुणे
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पुणे - हत्तीच्या येण्या-जाण्याच्या मार्गातून आपण महामार्ग केल्यानंतरही त्यांनी शांत राहिले पाहिजे. आपण हत्तींच्या आधिवासावर रोजच्या रोज हल्ले केले तरीही त्यांनी प्रतिहल्ला करायचा नाही. आपण हे विसरतोय की, जंगलातील सर्वांत शांत; पण सर्वशक्तिमान अशा प्राण्याशी झुंजत आहोत...हा संवाद साधत आहेत, देशातील वन्यजीवनावर माहितीपट बनविण्याची सुरवात करणारे आणि हत्तींचे अभ्यासक असलेले छायाचित्रकार राजेश बेदी.

माणूस आणि हत्ती यांच्यातील संघर्षाच्या घटना देशभरात वाढत आहेत. या संघर्षाच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाययोजना करण्यास कोणीच पुढे येत नाही. एका बाजूला आपण हत्तीला गणपतीचा अवतार मानतो, दुसरीकडे मात्र अत्यंत क्रूरतेने हत्तींना मारले जात आहे. यावरदेखील कोणी चर्चा करत नाही, अशी खंत सुरवातीलाच बेदी यांनी व्यक्त केली. 

पिढ्यान पिढ्या हत्तींचा येण्या-जाण्याचा मार्ग निश्‍चित आहे. त्यावर आपण महामार्ग बांधणार आणि शेती विकसित करणार. हत्तींना जंगलांमध्ये आता खायला मिळत नाही, पाण्याचे स्रोत वेगाने कमी होत आहेत. अशा परिस्थितीत हत्तींनी जायचे कुठे? असा सवाल बेदी यांनी केला. हत्तीबद्दल माणूस सहानुभूतीने विचार करणार नाही, तोपर्यंत ही समस्या संपणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.  

हत्तीप्रकल्पांची उपेक्षा
सर्व देशांचे संपूर्ण लक्ष व्याघ्रप्रकल्पांवर आहे. हत्तीप्रकल्पांची गेल्या काही वर्षांपासून उपेक्षा होत आहे. ‘वाघांना वाचवाल तर जंगल वाचेल’, अशी टिमकी सगळीकडे वाजविली जात आहे. प्रत्यक्षात ‘हत्तींना वाचविले तर, वाघ वाचतीलच; पण जंगलही वाचेल,’ कारण, हत्तीला खूप खायला लागते. तो फक्त जंगलातच राहू शकतो. माणसाने विकसित केलेल्या जागेत तो वास्तव्य करू शकत नाही. हत्ती असलेल्या जंगलात पाण्याचे स्रोत टिकवावे लागतील. त्यामुळे हत्ती वाचला तर जंगल वाचेल. त्यातून जंगलातील इतर प्राणी वाचतील, असे बेदी यांनी सांगितले. 

आजपासून रंगत
‘नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट’, ‘ॲड-व्हेंचर फाउंडेशन’, ‘वन विभाग’ आणि ‘फर्ग्युसन महाविद्यालय’ यांच्यातर्फे आयोजित केलेल्या ‘वाइल्ड इंडिया फिल्म फेस्टिव्हल’चे उद्या शनिवारी (ता. ४) राजेश बेदी यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता फर्ग्युसनच्या ॲम्पी थिएटर येथे उद्‌घाटन होणार आहे. यात बेदी हे त्यांनी केलेले हत्तीविषयातील काम ‘स्लाइड शो’तून मांडणार आहेत. तसेच, हिमबिबट्यावर चालू असणाऱ्या माहितीपटाची झलकही यात पाहता येईल. येत्या रविवारी (ता.५) सकाळी सहा वाजता वेताळ टेकडीवर नेचर ट्रेलचे आयोजन केले आहे.

Web Title: Conflict against elephants