‘ई-लर्निंग’ वरून ‘स्मार्ट’ गोंधळ

ब्रिजमोहन पाटील
शनिवार, 8 जून 2019

पुणे महापालिकेकडून २१ कोटी खर्च करून महापालिकेच्या शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’चा प्रकल्प राबविला जात आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटी कंपनीकडूनही असाच प्रकल्प पालिकेच्या शाळांमध्ये सुरू केला जाणार आहे.

पुणे - पुणे महापालिकेकडून २१ कोटी खर्च करून महापालिकेच्या शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’चा प्रकल्प राबविला जात आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटी कंपनीकडूनही असाच प्रकल्प पालिकेच्या शाळांमध्ये सुरू केला जाणार आहे. स्मार्ट सिटीने याबाबत महापालिकेला पूर्वसूचनाही दिलेली नाही. त्यामुळे दोन्ही संस्थांमधील गोंधळ समोर आला आहे. पर्यायाने महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या संस्थेच्या ‘ई-लर्निंग’चे धडे मिळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ प्रकल्पासाठी ‘बीएसएनएल’ला २१ कोटींचे काम दिले आहे. त्यामध्ये एक सेंट्रल स्टुडिओ, १३६ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम, ८१६ डिजिटल क्‍लासरूम असणार. मराठी, इंग्रजी, उर्दू भाषेत अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. शंभरपेक्षा अधिक शिक्षकांना ‘ई-लर्निंग’ बाबतचे प्रशिक्षण दिले आहे. येत्या शैक्षणिक वर्षात शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना ‘ई-लर्निंग’द्वारे शिक्षण मिळणार आहे. 

एकीकडे हा प्रकल्प सुरू असताना दुसरीकडे स्मार्ट सिटी कंपनीने बालभारतीच्या अभ्यासक्रमानुसार पहिली ते दहावीपर्यंतचे ‘ई-लर्निंग’चे सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्याचे काम सुमारे ८० टक्के पूर्ण झाले आहे. शाळांमध्ये प्रकल्प राबविण्यासाठी नुकतीच पालिकेच्या अधिकाऱ्यांची स्मार्ट सिटी कंपनीसोबत बैठक घेतली. त्यामध्ये या प्रकल्पाबाबत सूचना दिल्या आहेत. 

शहरात स्मार्ट सिटी कंपनी ‘ई-लर्निंग’चा प्रकल्प राबवत असल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी खरमरीत पत्र काढून पालिका अधिकाऱ्यांकडे या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. महापालिका राबवीत असलेला प्रकल्प स्मार्ट सिटी कंपनीने कसा सुरू केला. महापालिकेला आवश्‍यक नसलेला प्रकल्प जर नव्याने सुरू करायचे असल्यास कामात सुसूत्रता राखण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्‍यक आहे, असे त्यात नमूद केले. त्यावरून स्मार्ट सिटी आणि पुणे महापालिकेच्या कामातील गोंधळ समोर आला. दरम्यान, याबाबत सौरभ राव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

परवानगीनंतर बैठकीला जा 
स्मार्ट सिटीच्या बैठकीला महापालिकेचे अधिकारी परस्पर जात आहेत. तसेच त्याचा अहवालही सादर केला जात नाही. त्यामुळे कामात सुसूत्रता नाही. त्यामुळे आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीला जाण्यापूर्वी परवानगी घ्या आणि बैठकीचा अहवाल सादर करा, असे आदेश सर्व खातेप्रमुख आणि सहायक आयुक्तांना दिले आहेत.

पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटी राबवत असलेला प्रकल्प पूर्णपणे वेगळा आहे. स्मार्ट सिटीने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ई-लर्निंग’चे सॉफ्टवेअर तयार केले. परंतु त्याची अंमलबजावणी करण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे या प्रकल्पाचा पहिला टप्पा पालिकेच्या शाळांमध्ये राबविला जावा, यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. 
- राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion from e-learning