तळेगावात बेकायदा कामांवरून गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

कामगार राज्यमंत्र्यांच्या कामांच्या खर्चास स्थगिती
राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभासाठी केलेला खर्च अवाजवी असून, यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुनील शेळके केला. तसेच ती बिले देऊ नयेत, अशी मागणी केली. या बिलांना स्थगिती देण्याचा निर्णय करण्यात आला. सभेत अरुण भेगडे, शोभा भेगडे, कल्पना भोपळे, वैशाली दाभाडे, अरुण माने यांनी सहभाग घेतला.

तळेगाव दाभाडे - तळेगावात झालेल्या बेकायदा विकासकामांच्या बिलांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सत्तारूढ नगरसेवक सुनील शेळके यांनी सर्वसाधारण सभेचे कामकाज रोखून धरले. अखेर सहा सदस्यीय समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शेळके यांनी विविध प्रश्‍नांवर प्रशासनाला धारेवर धरले. शेळके म्हणाले, ‘‘गाव आणि स्टेशनचा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळित असून, अधिकारी भ्रष्ट कारभारात गुंतले आहेत. पालिकेच्या मालकीचे विद्युत पंप ठराव न करताच परस्पर विकल्याने ही वेळ आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविताना केलेल्या खर्चाचा तपशील लागत नाही. रेल्वे भुयारी मार्ग करताना पाण्याचा निचरा करण्याची उपाययोजना केली नाही. जेसीबी व पोकलेन मशिन लावून केलेल्या कामावर कोट्यवधी रुपये बेकायदा व अवाजवी खर्च केले गेले. पाणी योजना व भुयारी गटार योजनेचे काम करण्याचे नियोजन नाही. व्यापारी संकुलाची उभारणी करून गरीब टपरीधारकांना वाऱ्यावर सोडले. त्यांना सामावून घ्यावे, रेल्वेच्या जागेत ठराव नसताना रस्ता, वृक्ष लागवड व ठिबक सिंचनावर अवाजवी खर्च केला.

या सर्व बिलांची चौकशी करावी.’’ जेसीबीच्या बिलांवरून काम मला द्या, मी नगरसेवक पदाचा राजीनामा देतो, असा उपरोधिक टोला मुख्याधिकारी शेळके यांनी लगावला. दोनशे कोटींचा निधी आणून अशी कामाची पद्धत असेल तर राज्यमंत्र्यांसह आम्हाला अडचणीत आणण्याचे काम मुख्याधिकारी करीत आहेत का,  असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. खर्चाचा तपशील सभागृहात सादर करावा तोपर्यंत सभा तहकूब करण्याची आग्रही भूमिका घेतली. नगराध्यक्षा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, सभागृह नेते सुशील सैंदाणे यांनी सभा चालू करावी, अशी भूमिका घेतल्यावर संबंधितांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर तहकूब झालेली सभा तीन वाजता सुरू झाली. पाणी विभागातील कर्मचाऱ्यांना कामे होत नसतील तर घरी बसावे, असे माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी सुनावले. गणेश खांडगे यांनी हॅचिंग स्कूलच्या बाहेरील वाहने थाबल्याने अपघाताची शक्‍यता लक्षात घेऊन वाहनतळाचा प्रश्‍न मांडला. मात्र, भाजी मार्केटमधील विक्रेत्यांकडे पैसे मागणी केली जाते, असे कारण पुढे करीत शेडचा विषय स्थगित ठेवला. सभेत प्रमुख विषयांसह एकशे दहा विषयांवर सविस्तर चर्चा झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion on illegal work in talegaon dabhade