समाविष्ट गावांत करवसुलीचा गोंधळ 

समाविष्ट गावांत करवसुलीचा गोंधळ 

पुणे - महापालिकेत नव्याने समाविष्ट अकरा गावांतील ग्रामपंचायतींकडील मिळकतींच्या नोंदीत गोंधळ असल्याचे उघड झाले आहे. बहुतांशी मिळकती या बांधकाम व्यावसायिकांच्या नावावर असल्याने मिळकतींच्या मालकांपर्यंत नोटिसा पोचत नसल्याने करवसुलीत अनेक अडचणी येत आहेत. 

महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मिळकतकर विभागाने मिळकतकर आणि त्याची थकबाकी वसूल करण्यावर भर दिला आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट अकरा गावांतून दोनशे कोटी रुपयांचा कर मिळण्याचा अंदाज या विभागाचा आहे; परंतु ग्रामपंचायतींनी घातलेल्या गोंधळामुळे महापालिकेसमोर अनेक अडथळे येत आहेत. याचवेळी ग्रामपंचायतींच्या कारभारामुळे सदनिका मालकांचीही चिंता वाढली आहे. 

हद्दीलगतची अकरा गावे महापालिकेत आल्यानंतर ग्रामपंचायतींकडील दप्तर महापालिकेने ताब्यात घेतले. त्यात या गावांमध्ये ७० ते ८० हजार निवासी आणि व्यावसायिक मिळकती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार महापालिकेकडून मिळकतकर आकारून मिळकतधारकांना नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू झाली. महापालिकेला या गावांतून दोनशे कोटी रुपयांचा कर मिळण्याचा अंदाज आहे. 

सोसायट्यांमधील सदनिका अजूनही बांधकाम व्यावसायिकांच्या नावावर आहेत. मात्र, नोटिसा सदनिका मालकांच्या नावाने पाठविण्यात आल्याचीही उदहारणे आहेत. मुळात, ग्रामपंचायतींकडे मिळकतींची नोंदणी झाली, तेव्हाच सदनिका मालकांनी आपली नावे दिली आहेत. मात्र, तशा नोंदी आता दिसत नसल्याने मिळकतकराचे उद्दिष्ट पूर्ण होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, महापालिकेने सर्व ग्रामपंचायतींकडील नोंदवह्या ताब्यात घेतल्या, तेव्हाच नोंदणीत फेरफार केल्याचे दिसून आले होते. मिळकतींची माहिती दडविण्यापासून व्यावसायिक मिळकती निवासी असल्याचे दाखविण्यात आल्याचे प्रकारही नोंदवह्याच्या तपासणीनंतर आढळले होते. 

गावांमधील प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर मिळकतकराच्या त्रुटी दूर करण्यात येतील. पालिकेच्या दराने कर आकारल्याबाबत मिळकतधारकांना नोटिसा दिल्या आहेत.
- विलास कानडे, प्रमुख, मिळकत विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com