विद्यार्थी परीक्षा केंद्रावर...अन्‌ केंद्राला कुलूप;शासकीय संगणक टायपिंग परीक्षेत गोंधळ 

मीनाक्षी गुरव 
Tuesday, 2 March 2021

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (जीसीसी-टीबीसी) मंगळवारपासून सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी जवळपास एक लाख १६ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली होती, तर राज्यातील ३०० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती.

पुणे : शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा होणार म्हणून कोरोनाच्या संकट काळातही असंख्य विद्यार्थी घरापासून कोसो दूरचे असणाऱ्या परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेपूर्वीच दाखल झाले. मात्र, केंद्रावर परीक्षेच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली नसल्याने, तर काही परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वाराला कुलूप असल्याने विद्यार्थी गोंधळात पडले. नियोजित वेळेपर्यंत परीक्षा केंद्रावर थांबल्यानंतरही केंद्रावर कोणीही न फिरकल्याने राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून मुकावे लागले. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (जीसीसी-टीबीसी) मंगळवारपासून सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी जवळपास एक लाख १६ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली होती, तर राज्यातील ३०० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. काही ठिकाणी नियोजित वेळेनुसार ही परीक्षा झाली. परंतु कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात त्या-त्या स्थानिक प्रशासनाने शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान ही परीक्षा घ्यायची की नाही, याबाबत स्थानिक प्रशासन, परीक्षा परिषद यांच्याकडून येणाऱ्या सूचना यामध्ये गोंधळ उडाल्याने अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रे बंद ठेवण्यात आल्याचे दिसून आले. परिणामी काही विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली आहे.

लष्कर भरतीच्या नावाखाली फसवणूक;गुन्हे शाखेकडून दोघांना अटक 

तळेगाव ढमढेरे येथील सायली ढमढेरे या बी.एस्सी (मायक्रोबायलॉजी) झालेल्या विद्यार्थिनीने देखील परीक्षेसाठी अर्ज केला होता. मागील आठवड्यात मिळालेल्या हॉल तिकिटावर दिलेल्या (घरापासून एक-दीड तास अंतरावरील) परीक्षा केंद्रावर मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ती पोचली. तिच्या हॉल तिकिटावर सकाळी सव्वा आठ वाजता ‘रिपोर्टिंग’ची वेळ दिली होती. त्याप्रमाणे ती परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोचली. परंतु केंद्राला बाहेरून कुलूप असल्याचे तिने पाहिले. ती म्हणाली, ‘‘परीक्षेबाबत कोठेही काही सूचना फलक लावण्यात आलेला नव्हता. मी थोडावेळ वाट पाहिली. परंतु परीक्षा केंद्रावर काहीच हालचाल नव्हती. कोणीही फिरकले नाही. शेवटी संगणक प्रशिक्षण संस्थेची संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर परीक्षा संपेपर्यंत तिथेच प्रवेशद्वाराबाहेर वाट पाहत थांबले. त्यानंतर घरी निघून आले.’’ सायलीप्रमाणेच अमरावती, औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांना देखील परीक्षेचे केंद्र बंद असल्यामुळे परीक्षा देता आली नाही. या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण संस्थेमार्फत परीक्षा परिषदेकडे त्याबाबत तक्रारी केल्या आहेत. 

30 टक्के हॉटेल व्यवसाय अजूनही बंदच! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील स्थिती
 

परीक्षेतील गोंधळाचे कारण 

- विषयांकित परीक्षा यवतमाळ, औरंगाबाद जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्याचा आदेश (२६ फेब्रुवारी) 
- त्यानंतर औरंगाबाद जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये होणार परीक्षाचे आदेश (२६ फेब्रुवारी शुद्धीपत्रक)- अमरावती आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये पुढील आदेशापर्यंत परीक्षेला स्थगिती (२६ फेब्रुवारी आणि १ मार्च) 
- अमरावती, हिंगोली जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये (औरंगाबाद जिल्ह्यासह) परीक्षा घेण्याची सूचना (१ मार्च) 
- वारंवार असे आदेश, शुद्धीपत्रके काढणे आणि स्थानिक प्रशासनाकडून परीक्षेबाबत कोणतीही सूचना न येणे 
- परिणामी अनेकांनी परीक्षा केंद्र बंद ठेवली 

परीक्षा होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना ‘बॅच’ बदलून मिळणार 
‘‘नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात अडचणी आणि परीक्षा न झाल्याच्या तक्रारी राज्य परीक्षा परिषदेकडे आल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, परीक्षेसाठी ‘बॅच बदलून’ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निश्चित राहावे. परंतु परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी ‘बॅच बदलून’ देण्याबाबत संगणक प्रशिक्षण संस्थेमार्फत परिषदेला त्याबाबत कळवावे.’’ 
- तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion in students center locked government computer typing examination