मतदार यादीत अद्यापही गोंधळच 

मतदार यादीत अद्यापही गोंधळच 

पुणे - पुणे महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ पाच दिवस शिल्लक राहिले असताना, 19 प्रभागांच्या मतदार यादीत काही नावे समाविष्ट केल्याचे किंवा वगळल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाने आज जाहीर केले. त्यामुळे, त्या मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे, तसेच मतदान कोठे करावयाचे, याबाबतही त्यांच्यात गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे. 

मतदानासाठीच्या इलेक्‍ट्रॉनिक यंत्रावरील उमेदवारांची नावे टाकण्याबाबतही मतदार गोंधळात पडतील, अशी रचना पुण्यात केल्याचे दिसून येते. त्यातुलनेत पिंपरी- चिंचवड महापालिकेतील निवडणूक यंत्रणेने यंत्रावरील नावे अधिक सुलभ पद्धतीने वापरल्याचे दिसून येते. 

प्रभाग क्रमांक 24 (रामटेकडी- सय्यदनगर)मध्ये 2641 मतदारांची नावे, प्रभाग 2 (फुलेनगर- नागपूर चाळ)मध्ये 2466 मतदारांची नावे, प्रभाग 38 (बालाजीनगर- राजीव गांधीनगर)मध्ये 1450 नावे, प्रभाग 22 (मुंढवा- मगरपट्टा सिटी)मध्ये 1367 नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्याचबरोबर प्रभाग 22 मधील 291 मतदारांची नावे वगळली, तर प्रभाग 21 (कोरेगाव पार्क- घोरपडी)मध्ये 291 मतदारांची नावे समाविष्ट केली, तर वगळलेल्या मतदारांची संख्या 1348 आहे. प्रभाग सात (पुणे विद्यापीठ- वाकडेवाडी)मध्ये एक नाव वाढले, तर 313 मतदारांची नावे वगळली. प्रभाग 29 (नवी पेठ- पर्वती) मध्ये 235 नावे समाविष्ट केली, तर 336 जणांची नावे वगळली. या पद्धतीने 19 प्रभागांतील मतदारांच्या यादीत बदल केले. अंतिम मतदार यादी जाहीर केल्यानंतर महापालिकेच्या निवडणूक विभागाने तीनदा बदल केले. 

मतदानासाठीच्या एका इलेक्‍ट्रॉनिक यंत्रावर 16 उमेदवारांची नावे लिहिता येतात. पिंपरी- चिंचवड पालिकेने एका प्रभागातील दोन गट एका यंत्रावर, तर दुसऱ्या यंत्रावर उर्वरित दोन गटांतील उमेदवारांची नावे लिहिली आहेत. पुणे महापालिकेने मात्र दोन गटांमध्ये एक जागा सोडून सलग नावे लिहिण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पहिल्या यंत्रावर "अ' आणि "ब' गटाची पूर्ण नावे, तर "क' गटातील काही नावे पहिल्या यंत्रावर शेवटी, तर काही नावे दुसऱ्या यंत्रावर वरच्या बाजूला येतील. त्यानंतर "ड' गटातील उमेदवारांची नावे असतील. प्रत्येक गटासाठी वेगळा रंग वापरण्यात येणार आहे. तरीदेखील मतदानासाठी केंद्रावर गेलेल्या मतदारांपुढे या पद्धतीच्या उमेदवारांच्या नावामुळे गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. 

यंदा प्रथमच मतदारांना चार नगरसेवकांच्या जागांसाठी मतदान करावयाचे आहे. कोणत्या गटात कोणते उमेदवार आहेत, ते अनेकांना केंद्रावर पोचल्यावरच कळण्याची शक्‍यता आहे, त्यातच मतदान यंत्रावरील नाव टाकण्याच्या पद्धतीमुळे मतदार गोंधळात पडण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com