जलतरण तलावाच्या लोकार्पणप्रसंगी गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादातून घोषणाबाजी

राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादातून घोषणाबाजी
चिखली - पूर्णानगर-संभाजीनगर येथील जलतरण तलावाच्या लोकार्पणप्रसंगी शनिवारी (ता. 8) राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणायुद्ध रंगले. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, पोलिस बंदोबस्तात पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शैलजा मोरे यांनी नारळ वाढवून तलावाचे लोकार्पण केले.

भाजपच्या वतीने महापालिकेने बांधलेल्या या तलावाचा लोकार्पण कार्यक्रम आयोजित केला होता; परंतु राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते 21 डिसेंबर 2016 रोजी त्याचे उद्‌घाटन झाले होते; तसेच तो नागरिकांना खुला केला होता. तलावाचे लोकार्पण करून भाजप हा राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामाचे श्रेय घेत आहे, असा आरोप करून राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम आणि नारायण बहिरवाडे यांनी कार्यकर्त्यांसह काळे झेंडे दाखवत कार्यक्रमाला विरोध केला.

तीन महिन्यांपूर्वी उद्‌घाटन करूनही तलाव लोकांसाठी खुला केला जात नाही. त्यासाठी हा लोकार्पण कार्यक्रम आयोजित केल्याचे भाजपचे स्थानिक नगरसेवक केशव घोळवे, तुषार हिंगे यांचे म्हणणे होते.

विकासकामाचे श्रेय लाटणाऱ्या भाजप नेत्यांचा धिक्कार असो, अशा घोषणा "राष्ट्रवादी'तर्फे देण्यात आल्या; तर आपला जयजयकार, विजय असो अशा प्रतिघोषणा भाजपने दिल्याने परिसरात गोधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्‍यात आणली.

"राष्ट्रवादी'च्या नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या, की निवडणुका आणि पाणी शुद्धीकरणात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे तलाव खुला करताना उशीर झाला; परंतु काही दिवसांपासून तो खुला केला आहे. नागरिकही पोहण्यासाठी येत आहेत. मात्र, भाजप नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या कामाचे क्षेय लाटण्यासाठी लोकार्पणाचा घाट घातला. त्या म्हणाल्या,की महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप यांना या तलावाचे उद्‌घाटन झाल्याचे सांगितल्यावर ते कार्यक्रमाला आले नाहीत; परंतु उपमहापौरांच्या हस्ते दुसऱ्यांचा तलावाचे उद्‌घाटन करून घेतले. माझ्या मॉडर्न वॉर्डला विरोध करणारे आज आम्ही केलेल्या विकासकामाचे उद्‌घाटन करतात. अगोदर विकासकामे करा, मगच श्रेय घ्या, असे त्यांनी भाजपच्या नगरसेवकांना बजावले.

स्थानिक नगरसेवक केशव गोळवे म्हणाले, की कोणाच्याही कामाचे श्रेय घ्यायचे नाही. तलावाचे उद्‌घाटन होऊन तो खुला केला नव्हता. त्याचा फक्त आम्ही पाठपुरावा केला आहे. महापालिकेने जनतेच्या करातून उभारलेला तलाव खुला केला. त्यात राजकारण किंवा श्रेयचा काहीही संबंध नाही.

Web Title: confussion in swimming tank inauguration