केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयक पारित केल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात शहर काँग्रेसच्या वतीने गुलटेकडी मार्केट यार्डात शुक्रवारी (ता. २) आंदोलन करण्यात आले.

मार्केट यार्ड : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयक पारित केल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात शहर काँग्रेसच्या वतीने गुलटेकडी मार्केट यार्डात शुक्रवारी (ता. २) आंदोलन करण्यात आले. भाजपा सरकारने तीन 'काळे कायदे ' आणले आहेत. ते तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी काँग्रेसकडून राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले. तसेच विविध फलक दाखवून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, नगरसेवक आबा बागुल, कमल व्यवहारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. यावेळी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोदी सरकारने देशातील शेती व शेतकरी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले आहे. केंद्रातील भाजपा सरकारने तीन 'काळ्या कायद्याच्या माध्यमातून देशातील' हरित क्रांती नष्ट करण्याचा कुटील डाव रचला आहे. शेतकऱ्यांचा आवाज ऐकणे तर दुरच राहिले शेतकऱ्यांचे संसदेतील प्रतिनिधी असलेल्यांचा आवाजही बंद केला आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार केला  आहे. संविधान, संसदीय प्रणाली, संघराज्य व्यवस्था या सर्वांना धाब्यावर बसवून कोणतीही चर्चा अथवा संवाद न करता मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर हे तीन' काळे कायदे' मंजूर करवून घेतले आहेत.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

देशातील शेतकरी, शेतमजूर, अडते, कामगार, कर्मचारी व लाखो लोकांचे या विधेयकावर आक्षेप आहे. जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी आणि शेतमजूर यांना काही उद्योपतींचे गुलाम बनवण्याचे मोठे षडयंत्र आहे. आज देशभरातील ६२ कोटी शेतकरी, कामगार व २५० पेक्षा अधिक शेतकरी संघटना या' काळ्या कायद्याच्या विरोधात आवाज उठवत आहेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार या आवाजाकडे दुर्लक्ष करुन देशाची दिशाभूल करत आहेत. राज्यसभेमध्ये तर लोकशाहीचे अक्षरशः धिंडवडे काढत हा कायदा मंजूर करवून घेतला. काँग्रेस पक्षासह इतर विरोधी पक्षांनी या विधेयकांवर मतविभाजनाची मागणी केली होती. सदस्यांच्या या घटनात्मक अधिकारांचीही पायमल्ली करण्यात आली आहे. ६२ कोटी लोकांच्या जीवनाशी निगडीत विधेयके सभागृहात सुरक्षारक्षक तैनात करुन खासदारांशी धक्काबुक्की करून मतविभाजन न घेताच मंजूर करण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी, कामगारांच्या मुळावर हा काळा कायदा पास केला आहे. सध्या कामगार, शेतकरी उध्वस्त होत आहे. तरीही बीजेपी सरकार गप्प आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळायला हवा. बाजार समिती व्यवस्था नष्ट केली जात आहे. आता शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. जोपर्यंत हा शेतकरी, कामगार विरोधी कायदा मागे घेतला जात नाही. तोपर्यंत काँग्रेसचे आंदोलन रस्त्यावर होणार आहे. राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचा मी निषेध करतो.-रमेश बागवे, पुणे शहरध्यक्ष, काँग्रेस.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress agitation in Market Yard against Central Government's Agriculture Bill