Loksabha 2019 : पुण्यातील काँग्रेसच्या जागेचा निर्णय लांबणीवर 

Congress
Congress

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील उमेदवारीबाबत अद्याप एकमत झाले नसून, पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या जागांबाबतच आज कॉंग्रेस निवड समितीत चर्चा झाल्याने पुण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. दरम्यान, काही इच्छुकांनी दिल्लीत तळ ठोकला असून, उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. 

पुणे जिल्ह्यातील चारपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीनही जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे पुण्यातील कॉंग्रेसचा उमेदवार कधी जाहीर होणार, याकडे लक्ष लागले आहे. आज दिल्लीत कॉंग्रेस निवड समितीची बैठक होती. तीत पुण्याचा निर्णय होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. मात्र, ज्या भागातील निवडणुका पहिल्या टप्प्यात आहेत; त्याठिकाणचा निर्णय आधी करण्याचा निर्णय समितीने घेतला. त्यामुळे पुण्याविषयी चर्चा होऊ शकली नाही. पुढील बैठक 23 तारखेला असून, तीत पुण्याबाबत निर्णय होईल, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. 

दरम्यान, पक्षाच्या इच्छुकांची दिल्लीवारी सुरू झाली आहे. प्रवीण गायकवाड यांनी दिल्लीत महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार राजीव सातव, नितीन राऊत आदींची भेट घेतल्याचे समजते. खासदार संजय काकडे अद्याप कोणत्या पक्षातून लढणार, हे स्पष्ट झाले नाही. मात्र, तेही दिल्लीतील विविध नेत्यांच्या संपर्कात आहेत. माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड यांनीही दोन दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन पुण्याच्या जागेवर दावा केला होता. "निष्ठावान विरुद्ध बाहेरचा' हा पुण्यातील वादही इच्छुकांनी दिल्लीत पोहोचविला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. भाजप कोणाला उमेदवारी देणार, याचीही पक्षश्रेष्ठींकडून चाचपणी केली जात आहे. 

भाजपच्या वतीनेही पुण्यातील उमेदवारीबाबत अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही. भाजपच्या पहिल्या यादीत पुण्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता नसल्याचे भाजपच्या एका नेत्याने "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com