'कॉंग्रेस संपविण्याच्या कटात पक्षातीलच काही जण '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

पुणे - ""शहरातील कॉंग्रेस संपवण्याचा कट रचला जात असून, त्यात पक्षातीलच काही जण सहभागी आहेत,'' असा आरोप आमदार अनंत गाडगीळ यांनी शनिवारी केला. पक्षाची संघटना पुन्हा बांधण्यासाठी पुढाकार घेणार आहे. प्रभागनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकांपासून त्याची सुरवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

महापालिका निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या वाताहतीबद्दल पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते बोलत होते. गाडगीळ म्हणाले, ""पुण्यातून कॉंग्रेस संपू देणार नाही. महापालिका निवडणुकीत झालेल्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी थेट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे करणार आहे.'' 

महापालिका निवडणुकीआधी काही महिने पक्षातील काही जणांच्या बैठका विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर झाल्याची माहिती पुढे आली आहे. कॉंग्रेसचे हक्काचे प्रभाग राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जेमतेम अठरा तास राहिले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्यात आली, हे संशयास्पद आहे. याची संपूर्ण चौकशी दिल्लीतून व्हावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ""याबाबतचा अहवाल नुकताच दिल्लीला पाठवला आहे. महापालिकेच्या या निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या वाताहतीमुळे वाईट वाटले आहे. घरातील तीन पिढ्या आम्ही कॉंग्रेसबरोबर आहोत. त्यामुळे पक्षाच्या प्रथा, परंपरा, संकेत जवळून बघितले आहेत; मात्र या निवडणुकीत ते बाजूला ठेवण्यात आले. त्यामुळे या पराभवाचा शोध घेतल्यावर थक्क करणाऱ्या घटना पुढे आल्या आहेत. उमेदवारी देणे हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. यापूर्वीच्या बैठका कॉंग्रेस भवनावर होत असत. कॉंग्रेस भवनावर बैठका घेण्याच्या माझ्या आग्रहाकडे दुर्लक्ष केलेच; पण निवडणूक प्रक्रियेत मला सामावून घेतले नाही.'' 

""या निवडणुकीत प्रदेशच्या नेत्यांचे लक्ष नव्हते. जाहीर सभा, नेत्यांचे दौरे, प्रचार, पक्षाच्या उमेदवारांना मदत आणि मतदारांशी संपर्काचा अभाव जाणवतो. पक्षातील काही जणांनी हा ठरवून केलेला पराभव आहे, या निष्कर्षापर्यंत आलो आहे. त्याला बळ देणारे पुरावेही मिळत आहेत,'' असेही त्यांनी सांगितले. 

गाडगीळ म्हणाले, ""या निवडणुकीतील पराभवानंतर नेत्यांची, कार्यकर्त्यांची आत्मचिंतन बैठक होते; पण अद्यापही काहीच झाले नाही. या निवडणुकीत पक्षाची नीचांकी कामगिरी झाली; पण याची जबाबदारी घेताना कोणी दिसत नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी पक्षाच्या पातळीवर कोणतेच व्यासपीठ उपलब्ध नाही.'' 

Web Title: Congress conspiracy to finish Some party leader- Gadgil