कॉंग्रेसचे उपमहापौर-गटनेते यांच्यात कलगीतुरा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

पुणे - महापालिकेतील उपमहापौरपद हे घटनात्मक असून, पक्षाच्या कार्यक्रमात त्याचा साधा उल्लेखही न करता या पदाचा अनादर केल्याबद्दल उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी पक्षाकडे एका पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे; तसेच उपमहापौरांना नोटीस पाठविण्याचा गटनेत्यांना अधिकार आहे का, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे उपमहापौर आणि कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे, तर उपमहापौरांपेक्षा गटनेता मोठा असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसतर्फे 23 डिसेंबर रोजी स्वारगेट चौकात मेट्रोचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजित कदम यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. मात्र, या वेळी अलगुडे उपस्थित नव्हते; तसेच कॉंग्रेसमधील बैठकांनाही ते अनुपस्थित असल्याचे कारण दाखवत, गटनेते अरविंद शिंदे यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या पार्श्‍वभूमीवर अलगुडे यांनी बुधवारी कॉंग्रेस भवनमध्ये हजेरी लावली. शहराध्यक्ष रमेश बागवे आणि गटनेत्यांना पाठविलेल्या खुलाशात त्यांनी म्हटले आहे, की कॉंग्रेसतर्फे घेण्यात आलेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्‍सवर उपमहापौरांचे नाव किंवा छायाचित्रासह त्यांचा उल्लेखही नव्हता. त्या दिवशी गुडघ्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. तेथून परतत असताना कार्यक्रम संपला, असा निरोप मिळाल्यामुळे मी उपस्थित नव्हतो. म्हणून लगेचच गटनेत्यांनी मला नोटीस पाठविणे योग्य आहे का? त्यांना नोटीस पाठविण्याचा अधिकार आहे का? महापालिकेतील उपमहापौर हे पद घटनात्मक असून, ते कॉंग्रेसच्याच कार्यकर्त्याकडे आहे. तरीही त्याबाबत अनादर दाखविला गेला, हे अयोग्य आहे. पक्षाच्या आदेशानुसार प्रत्येक बैठकीस, कार्यक्रमांस मी उपस्थित असतो. त्यामुळे गटनेत्यांनी पाठविलेल्या नोटिशीतील आरोप बिनबुडाचे असून ते मला मान्य नाहीत.'

उपमहापौरांपेक्षा गटनेता मोठा
याबाबत अरविंद शिंदे म्हणाले, ""स्वारगेट चौकातील फ्लेक्‍सवर उपमहापौरांचे नाव नव्हते, हा पक्षाचा निर्णय आहे. पक्षापेक्षा कार्यकर्ता मोठा नाही, तर पक्षच मोठा आहे. उपमहापौरांपेक्षा गटनेताच मोठा आहे. त्यामुळेच अलगुडे यांना नोटीस पाठविली आहे. गटनेता निवडतानाचे नियम वाचल्यास गटनेत्यांच्या अधिकाराची माहिती उपमहापौरांना मिळू शकेल. पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपमहापौर अनुपस्थित होते, हे वास्तव आहे आणि त्याची विचारणा करणे ही पक्षाचा गटनेता आणि सच्चा कार्यकर्ता म्हणून जबाबदारीही आहे.''

Web Title: Congress Deputy Mayor between-group leader