'एमआयएम'शी हातमिळवणी नको'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

पुणे - महापालिकेतील स्वीकृत सदस्यपद पदरात पाडून घेण्यासाठी कॉंग्रेसने "एमआयएम'बरोबर आघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्या असतानाच, या पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या एका पदासाठी "एमआयएम'सारख्या जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी करू नये, अशी मागणी पक्षाचे नगरसेवक आबा बागूल यांनी केली. पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न असताना अन्य पक्षाच्या कुबड्या घेणे परवडणारे नाही, असेही बागूल यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पत्र पाठविले आहे.

महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसची पीछेहाट झाली असून, पक्षाला जेमतेम दहा जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेलाही दहा जागा मिळाल्याने एका स्वीकृत सदस्यपदासाठी आता चिठ्ठी काढावी लागणार आहे. मात्र, या पदासाठी कॉंग्रेसमधील काही घटकांनी "एमआयएम'च्या नगरसेविका अश्‍विनी लांडगे यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, त्याला बागूल यांनी विरोध केला आहे.

बागूल म्हणाले, 'निवडणुकीत पक्षाची पडझड झाल्याने पक्षविस्तार करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीतही काहीजण पक्ष संपविण्याचा कट रचत आहेत. अनेक प्रभागांमध्ये पक्षाचे अस्तित्वही राहिलेले नाही.

"एमआयएम'च्या लांडगे ज्या प्रभागातून निवडून आल्या, तेथे कॉंग्रेसने निवडणूक लढविली होती. तेव्हा, या पक्षाबरोबर घरोबा केल्यानंतर तेथील कार्यकर्त्यांना काय उत्तर द्यायचे?''

Web Title: congress do not friendship with mim