काँग्रेसचा ‘फिप्टी-फिप्टी’चा फॉर्म्युला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघावर दावा केला असताना काँग्रेसने मात्र ‘फिप्टी-फिप्टी’चा फॉर्म्युला समोर आणला आहे. शिवाजीनगर, कसबा, पुणे कॅंटोन्मेंट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघ मिळावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी प्रदेश काँग्रेसकडे केली आहे.

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघावर दावा केला असताना काँग्रेसने मात्र ‘फिप्टी-फिप्टी’चा फॉर्म्युला समोर आणला आहे. शिवाजीनगर, कसबा, पुणे कॅंटोन्मेंट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघ मिळावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी प्रदेश काँग्रेसकडे केली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे. दोन्ही पक्षात जागावाटप निश्‍चित होण्यापूर्वी दोन्ही पक्षांकडून संभाव्य जागांसाठी चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादीची नुकतीच बैठक झाली, त्यामध्ये त्यांनी पुण्यातील आठ मतदारसंघापैकी कसबा आणि पुणे कॅंटोन्मेंट हे दोन मतदारसंघ काँग्रेससाठी सोडून कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर, पर्वती, शिवाजीनगर आणि खडकवासला या सहा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीची नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यात शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, गटनेते अरविंद शिंदे  उपस्थित होते. त्यांनी पुण्यातील पुणे कॅंटोन्मेंट, शिवाजीनगर, कसबा आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे सांगितले. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते. कॅंटोन्मेंट, शिवाजीनगर आणि कसबा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. तर पर्वती विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सचिन तावरे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच या मतदारसंघात अभय छाजेड, आबा बागूल हे प्रबळ दावेदार काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे या मतदारसंघावरही काँग्रेसने दावा केला आहे. 

जोशी म्हणाले, ‘‘ राष्ट्रवादीने सहा जागांची मागणी केली असली तरी त्याचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते घेतील.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Fifty Fifty Formula for Vidhansabha Election Politics