काँग्रेस निष्ठावंतांचा स्वतंत्र मेळावा

उमेश घोंगडे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे - शहर काँग्रेसकडून निष्ठावंताना सामावून घेतले जात नाही. सातत्याने अपमानित केले जात असल्याचा आरोप करीत काँग्रेस निष्ठावंतांचा स्वतंत्र मेळावा घेण्याचा निर्धार नुकताच पुण्यातील निष्ठावंतांच्या बैठकीत करण्यात आला. पुढच्या महिन्यात हा मेळावा घेण्यात येणार असून, या मेळाव्याला राहुल गांधी यांना निमंत्रित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

पुणे - शहर काँग्रेसकडून निष्ठावंताना सामावून घेतले जात नाही. सातत्याने अपमानित केले जात असल्याचा आरोप करीत काँग्रेस निष्ठावंतांचा स्वतंत्र मेळावा घेण्याचा निर्धार नुकताच पुण्यातील निष्ठावंतांच्या बैठकीत करण्यात आला. पुढच्या महिन्यात हा मेळावा घेण्यात येणार असून, या मेळाव्याला राहुल गांधी यांना निमंत्रित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

निष्ठावंतांच्या या बैठकीला आमदार अनंत गाडगीळ, संजय बालगुडे, मुक्तार शेख, अनिल सोंडकर, सुनील मलके, काका धर्मावत, डॉ. सतीश देसाई, नरेंद्र व्यवहारे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार असूनही शहर काँग्रेसच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमाला बोलावण्यात येत नाही. बोलावलेच तर एका बाजूला बसवून अपमान करण्यात येतो, असे या वेळी आमदार गाडगीळ यांनी सांगितले.

देशात काँग्रेसला चांगले दिवस येत असताना पुण्यात अशी स्थिती का, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. मुळात शहर काँग्रेसकडून सामान्य कार्यकर्त्यांनाही पक्षाच्या कार्यक्रमात सामावून घेण्यात येत नाही, असा आरोप आमदार गाडगीळ यांनी सांगितले.

या संदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी निष्ठावंतांवर टीका केली. शहर काँग्रेसच्या कार्यक्रमांना बोलावूनदेखील ठराविक लोक जाणीवपूर्वक दूर राहतात. वरिष्ठ नेते आले की त्यांच्या पुढे-पुढे करतात. कार्यक्रमाला न येता टीका करतात. ज्यांनी महापालिका निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले. काहींनी तर थेट इतर पक्षांत जाऊन पक्षाच्या विरोधात निवडणूक लढविली, अशा लोकांना निष्ठावंत कसे म्हणणार, असा प्रश्‍न त्यांनी केला. दरम्यान शहर काँग्रेसची आज बैठक झाली. या बैठकीत ‘शक्‍ती ॲप’ आणि बूथ कमिटी स्थापन करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पक्षाची सदस्य नोंदणी व निधी गोळा करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन शहराध्यक्ष बागवे यांनी केले. शहर काँग्रेसच्या वतीने जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बागवे यांनी सांगितले.

Web Title: Congress Independent Campaign Politics