#MeToo पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का ? 

#MeToo पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का ? 

पुणे - प्रत्येक विषयावर बोलणारे आणि ‘मन की बात’ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी #MeToo वर गप्प का, असा सवाल काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी सोमवारी केला. राफेल विमान खरेदीवर ते गप्प आहेत, यातूनच ते दोषी असल्याचे स्पष्ट होते, अशी टीकाही शर्मा यांनी केली. 

#MeToo प्रकरणात परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर आरोप झाले आहेत. आज पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या साडेचार वर्षांतील कारभारावर जोरदार टीका केली. या वेळी त्यांना #MeToo प्रकरणावर विचारले असता त्यांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ची घोषणाबाजी करणाऱ्या मोदींनी यावर बोलले पाहिजे, अशी मागणी केली.

शर्मा म्हणाले, ‘‘राफेल विमान खरेदी प्रकरणात आता सरकारने पुरावे दडपण्याचे प्रकार सुरू केले आहेत. संरक्षणमंत्री हिंदुस्तान एरोनॉटिक्‍सऐवजी बेइमानांची वकिली करीत आहेत. अपराधी भावनेमुळेच मोदी यावर मौन बाळगून आहेत. या प्रकरणात देशाच्या सुरक्षिततेशी खेळ होत आहे. त्यामुळे राफेल प्रकरणाशी निगडित सर्व कागदपत्रे जप्त करावीत.’’

‘‘गेल्या साडेचार वर्षांत एकही आश्‍वासन मोदींनी पूर्ण केले नाही. दोन कोटी रोजगार देऊ, शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, परराष्ट्र धोरण मजबूत करू, अशी आश्‍वासने दिली; परंतु प्रत्यक्षात यापैकी काहीही झाले नाही. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर पंतप्रधानांच्या वयापेक्षाही अधिक वाढला आहे. इंधनदरांचा भडका उडाला आहे. त्यामुळे जनता आता गप्प आहे; परंतु ती विसरलेली नाही. आगामी निवडणुकीत ती जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही,’’ असे शर्मा यांनी सांगितले. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शमा मोहंमद, उल्हास पवार, मोहन जोशी, अभय छाजेड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

संस्थात्मक रचना बिघडवण्याचे काम 
सामरिक धोरण गटाच्या प्रमुखपदी अजित डोवाल यांच्या नियुक्तीवर बोलताना शर्मा म्हणाले, ‘‘देशाची संस्थात्मक रचना बिघडविण्याचे काम मोदी करीत आहेत. तिन्ही सेनादलांचे प्रमुख, कॅबिनेट सचिव, संरक्षण सचिव आणि गुप्तचर संस्थांचे प्रमुख या सर्वांवरील नियंत्रण आता डोवाल यांच्या हाती गेले आहे. हे देशाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून, दूरगामी परिणाम करणारे आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com