राष्ट्रवादीबरोबर युती नकोच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर युती नकोच, अशी भावना कॉंग्रेस भवनात जमलेल्या कार्यकर्त्यांपासून ते शहरातील प्रमुख नेत्यांपर्यंत सर्वांनी बुधवारी व्यक्त केली. गेली पाच वर्षे मतदार संघ बांधला असल्याने आपल्यालाच उमेदवारी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असून, राष्ट्रवादी आपल्याशी किती प्रमाणिक राहील, अशी शंका स्थानिक नेतृत्वाच्या मनात असल्याचे येथे स्पष्ट दिसले.

राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर आगामी महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून कॉंग्रेस भवन येथे सुरू झाल्या. त्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रभागातील कॉंग्रेसचे आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते यांनी कॉंग्रेस भवन येथे गर्दी केली होती. शहरात 2017 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याबाबत त्यांच्याकडे केलेल्या चाचपणीतून हा निष्कर्ष निघाला आहे. पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेल्या विधानसभेपासून कॉंग्रेसचा पंजा लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आखले. त्याला आता यश मिळत आहे. असे असताना आता स्वबळावर सत्ता आणण्याचा उद्देश नेतृत्वाने ठेवला पाहिजे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी नकोच, अशी भावना येथे जमलेल्या इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आम्ही पक्षाचे प्रामाणिक काम केले आहे. निवडणुकीची उमेदवारी ही केलेल्या कामाची पक्षाने दिलेली एक पोचपावती असते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी केल्यास जागा वाटपात पुन्हा काही जागा सोडाव्या लागणार. तेथील कॉंग्रेसचे इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यातून नाराज होणार, हे सरळ आहे. अशा नाराज कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराची अपेक्षा कशी ठेवता येईल, असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. कॉंग्रेसमधील नेतेही कार्यकर्त्यांच्या या मताचा आदर करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आघाडी करण्याचा निर्णय हा संपूर्णपणे स्थानिक पातळीवर करावा, असे प्रदेश कॉंग्रेसकडून सांगण्यात आल्याचेही नेत्यांनी सांगितले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्षाशी एकनिष्ठ राहणारा आणि पक्षाला परत चांगले दिवस यावे, यासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मताचा आदर राखला पाहिजे, अशा शब्दांत काही नेत्यांनी आघाडी नकोच, याला स्पष्टपणे दुजोरा दिला. 

Web Title: Congress leaders and activists feeling